IPL 2020: 'हिटमॅन इज बॅक'! मुंबई इंडियन्सच्या अंतिम लीग सामन्यापूर्वी रोहित शर्माचा नेटमध्ये कसून सराव, पाहा व्हिडिओ
रोहित शर्माचा नेट्समध्ये कसून सराव (Photo Credits: Twitter)

IPL 2020: भारतीय टीमचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेस अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही. रोहितला आयपीएलमधील (IPL) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला संघाच्या आयपीएलच्या काही सामन्यांना मुकावे लागले. या दुखापतीमुळेच त्याची भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) देखील निवड झाली नाही. परंतु त्यानंतर, वेगवेगळे व्हिडिओ आणि विधानांमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एक दिवस आधी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितच्या दुखापतीबाबत निवेदन दिले होते आणि आता रोहितचा फलंदाजी करताना दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. या स्पर्धेतील अखेरच्या लीग सामन्याआधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या ट्विटर अकाउंटवर रोहितचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. सराव करताना रोहितही मोठे-मोठे शॉट्स मारतानाही दिसत आहे. (Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का नाही झाली निवड? कोच रवि शास्त्री यांनी वैद्यकीय अहवालाबाबत माहिती देत सांगितले कारण)

या व्हिडिओमध्ये रोहित मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय फलंदाजी करताना दिसला. या दरम्यान रोहितने आपले सर्व आवडते फटकेही खेळले. रोहितच्या फिटनेसबाबत मात्र अद्याप स्थिती स्पष्ट झाली नाही, पण रोहितला फलंदाजी करताना काही अडचण असल्याचे दिसून आले नाही. रोहित मोठ्या आरामात फलंदाजीचा सराव करताना आणि त्याच जुन्या शैलीत फलंदाजी करताना आढळला. रोहित दुखापतीमुळे मुंबईसाठी आयपीएल सामन्यांमध्ये सामील होत नसला तरी तो आगामी प्ले ऑफमध्ये पुनरागमन करेल असे मानले जात आहे. यामुळेच तो नेट्समध्ये जोरदार फलंदाजीचा सराव करत आहेत. पाहा 'हिटमॅन'चा हा व्हिडिओ:

दरम्यान, मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 13 चा अंतिम साखळी सामना खेळला जाईल. मुंबईने यापूर्वीच प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले आहे, तर सोमवार 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने देखील प्ले ऑफमधील स्थान निश्चित केलं आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यात 5 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा पहिला क्वालिफायर खेळला जाईल. तर हैदराबादने मुंबईचा पराभव केल्यास ते चौथे स्थान मिळावतील.