दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2020 Playoffs Scenario: इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 13वी आवृत्ती लीगच्या अंतिम टप्प्यात आली असताना आयपीएल 2020 च्या प्लेऑफ (IPL PlayOffs) पात्रतेसाठी तीन स्थान अद्याप रिक्त आहेत. आतापर्यंत फक्त रेकॉर्ड चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात स्थान मिळविले असून तब्बल सहा संघांमध्ये उर्वरित तीन स्थानासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आश्चर्यकारक म्हणजे तीन वेळा आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा खराब मोहिमेनंतर प्ले ऑफ पात्रता गमावली. तथापि, सीएसके स्पर्धेतून लवकर बाहेर पडली असल्यावरही इतर प्रत्येक संघ बाद फेरीत मुंबई इंडियन्ससह सामील होण्यासाठी झुंज देत आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalor) आणि राजस्थान रॉयल्सने अंतिम चारची पात्रता मिळवण्यासाठी काय केले पाहिजे यावर एक नजर टाकूया. (IPL 2020 Points Table Updated: KXIP विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये झाले मोठे बदल, प्ले ऑफ शर्यतीत आणली रंगत)

आरसीबी: प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी विराट कोहलीची टीम चांगली दिसत आहे. त्यांचे 12 सामन्यात 14 गुण आहेत आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीला अंतिम चारमध्ये क्वालिफाय करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. जर त्यांनी दोन्ही खेळ गमावले तर 14 गुणांवरील इतर संघांशी स्पर्धा करतील आणि त्यांचे भविष्य इतर निकालांवर आणि नेट रनरेटवर अवलंबून असेल.

दिल्ली कॅपिटल्स: दिल्ली कॅपिटल्सला देखील प्ले ऑफ गाठण्यासाठी एका विजयाची गरज आहे. त्यांचे देखील 12 मॅचमध्ये 14 पॉईंट्स असून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे आणि प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी डीसीला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एक विजय आवश्यक आहे. जर त्यांनी दोन्ही सामने गमावले तर त्यांची प्रगती दुसऱ्या संघांवर आणि नेट रनरेटवर अवलंबून असेल.

किंग्स इलेव्हन पंजाब: सलग पाच सामन्यात विजय मिळवणाऱ्या पंजाबची घोडदौड राजस्थान रॉयल्सने रोखली, पण ते अद्याप गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये कायम आहेत. पंजाबला स्पर्धेतील आपला उरलेला एकमेव सामना जिंकण्याची गरज आहे आणि कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान आपला खेळ गमावतील किंवा त्यांच्या तुलनेत त्यांचा नेट रन-रेट कमी असेल अशी अपेक्षा करतील, तर आरसीबी आणि डीसीने त्यांचे किमान एक सामना जिंकला पाहिजे.

राजस्थान रॉयल्स: पंजाबविरुद्ध मागील विजयाने राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा आशा उंचावल्या असतील. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वातील संघाला उर्वरित खेळ जिंकणे गरजेचे आहे, शिवाय कोलकाता, हैदराबाद किंवा पंजाब यांना त्यांच्या शिल्लक असलेल्या सामन्यात पराभूत होणे रॉयल्ससाठी फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे, आरसीबी आणि दिल्लीने त्यांचे सामने जिंकणेही गरजेचे आहे.

कोलकाता नाईट रायडर्स: प्ले ऑफमध्ये पात्रता येण्याची एक संधी मिळण्यासाठी नाईट रायडर्सला अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करणे आवश्यक आहे. केकेआरने आपला अंतिम सामना जिंकल्यास त्यांचे 14 गुण होतील आणि त्यानंतर समान गुणांवरील इतर संघांच्या तुलनेत त्यांचा नेट रनरेट जास्त असेल यासाठी आशावादी राहतील.

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील संघाचे प्लेऑफ पात्रता त्यांच्या स्वत:च्या हातात आहे. हैदराबादचे दोन मॅच शिल्लक आहेत आणि त्यांचा नेट नेट रन-रेट पाहता दोन्ही सामना जिंकून ते पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकतात. सनरायझर्स उर्वरित सामन्यांपैकी एकही सामना गमावला तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील.