BCCI. (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) चा 13 वा सिझन 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर टी-20 विश्वचषक रद्द झाल्यानंतर, आता बीसीसीआय (BCCI) युएईमध्ये (UAE) आयपीएलच्या एका शानदार स्पर्धेची तयारी करत आहे. आयपीएलसाठी संघ आता युएईला रवाना होऊ लागले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब युएईला रवाना होणारा पहिला संघ ठरला आहे. या प्रवासाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. मात्र ताज्या अहवालानुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. म्हणूनच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, यावर्षीच्या आयपीएलसाठी गल्फ राष्ट्रात पोहोचणार्‍या आपल्या खेळाडूंबाबत थोडे चिंताग्रस्त आहेत.

याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘युएईमधील कोरोनाची स्थिती पाहता सर्व खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी, मालक व इतर सदस्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्याच्या चुकीमुळे, इतरांना संसर्ग व्हावा आणि त्यांचा त्रास वाढवा अशी आमची इच्छा नाही.’ पुढे ते म्हणाले. ‘युएई खेळाडूंच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत (वैद्यकीय किंवा अन्य) उपलब्ध करून देणार आहे. संघांच्या मालकांनाही इकडे-तिकडे मुक्तपणे फिरू नका असे सांगितले गेले आहे. बऱ्याच विलंबानंतर आणि समस्येनंतर आता आयपीएल होणार आहे आणि सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे. यासाठी सर्वांनीच जबाबदार रहावे.’ (हेही वाचा:  दक्षिण आफ्रिकेच्या दोन क्रिकेटपटुंना करोनाची लागण, खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा CSA चा निर्णय)

गेल्या महिन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. त्याने टीमचा बायो-सुरक्षित प्रोटोकॉल तोडल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, जवळपास सहा वर्षानंतर आयपीएल पुन्हा एकदा युएईमध्ये होत आहे. यापूर्वी 2014 मध्येही आयपीएल युएईमध्ये खेळला गेला होता, परंतु त्यावेळी पहिले काही सामनेच तिथे खेळले गेले होते. परंतु यावेळी संपूर्ण आयपीएल युएईमध्येच होईल. आयपीएल 13 हा अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथे खेळला जाणार आहे.