IPL 2020 Final Date: दोन दिवस पुढे ढकलले जाणार आयपीएल फायनल, जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये कधी होऊ शकते अंतिम लढत!
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) खेळला जात आहे. भारतात कोरोना व्हायरस महामारीच्या वाईट स्थितीमुळे यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचे (IPL) अध्यक्ष बृजेश पटेल यांनी गेल्या आठवड्यात ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल याची पुष्टी केली होती. टी-20 वर्ल्डकप रद्द झाल्याने लीग आयोजित करण्यासाठी संपूर्ण 51 दिवसाची विंडो उपलब्ध आहे. तथापि, TOIच्या अहवालानुसार 8 नोव्हेंबरची अंतिम लढत 10 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकते. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची (IPL Governing Council) रविवारी (2 ऑगस्ट) बैठक होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक व अन्य आवश्यक तपशिलांची पूर्तता होईल. टाइम्स ऑफ इंडिया मधील वृत्तानुसार दिवाळी आठवड्याचा उपयोग करण्यासाठी बीसीसीआय आयपीएल फायनलची तारीख (IPL Final Date) स्थगित करू शकते. (IPL 2020 Update: आयपीएल 13 साठी रिषभ पंतची जय्यत तयारी, एमएस धोनी सारखा मारतोय हेलिकॉप्टर शॉट Watch Video)

असे झाल्यास लीगच्या 13 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा रविवारखेरीज इतर कोणत्याही दिवशी अंतिम लढत पाहायला मिळेल. 3 डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वेळापत्रकात अडचण येऊ नये म्हणून तारीख पुढे ढकलले जात असल्याचेही समजले आहे. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मार्गदर्शक सूचनांनुसार टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये 14 क्वारंटाइन राहणे आवश्यक असेल. याउलट घडामोडींशी संबंधित सूत्रांनी म्हटले आहे की, आयपीएलमधून लवकर संघ बाद झाला तर स्पर्धा संपुष्टात येण्याची वाट पाहत त्यांना युएईमध्येच राहावे लागेल.

याचा अर्थ भारतीय संघ आयपीएलनंतर थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. “खेळाडू आयपीएलच्या कोणत्याही सामने नसले तरीही ते युएईमध्येच राहतील आणि तेथील शिबिरामध्ये सहभागी होतील. आयपीएल संपताच लीगचे अंतिम बाद फेरीतील सामने खेळण्यात व्यस्त असलेले उर्वरित खेळाडू उर्वरित सामील होतील आणि संपूर्ण टीम तिथून एकत्र उड्डाण करेल,” सूत्रांनी म्हटले. दरम्यान, स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला स्वतंत्र बायो बबल लावण्यात येईल आणि बाहेरील लोकांशी कोणताही संपर्क होणार नाही असाही अंदाज वर्तविला जात आहे.