राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2020: आयपीएलचा (IPL) 13 वा हंगाम सध्या उतरार्धाकडे झुकला असून अंतिम चारमध्ये पोहचण्यासाठी संघामध्ये सध्या चुरस निर्माण झाली आहे. अशा स्थितीत खेळाडूही आपला सर्वश्रेष्ठ खेळ करत आहेत. मात्र, यंदा आयपीएलमध्ये सर्वात महागड्या खेळाडूंचे खेळ अपेक्षेप्रमाणे राहिले नाही. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes), जो आपल्या मोठ्या शॉट्ससाठी प्रसिद्ध आहे तो आयपीएल 13 मध्ये पहिला षटकार मारण्यासाठी धडपडत आहे. त्याला गुरुवारी देखील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एकही षटकार ठोकता आला नाही. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) स्टोक्सने या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 103 चेंडूंचा सामना केला आहे परंतु त्याला एकही षटकार लगावला नाही. त्याने मात्र 14 चौकार ठोकले आहेत आणि 22च्या सरासरीने 110 धावा केल्या आहेत. या हंगामात आयपीएलमधील आजवरची त्यांची सर्वोच्च धावसंख्या 41 आहे. त्याने हैदराबादविरुद्ध 30 धावा केल्या आणि त्यानंतर राशिद खानच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. मागील हंगामातही त्याला नऊ सामन्यांत फक्त चार षटकार ठोकता आले होते. (IPL 2020: आयपीएल दे दणादण! 13व्या हंगामात कोणत्या 10 खेळाडूंनी ठोकले सर्वात मोठे षटकार, जाणून घ्या)

इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टोक्सला रॉयल्सने 12 कोटी 50 लाखात विकत घेते होते. फ्रँचायझीने स्टोक्सवर भरमसाठ पैसा लगावला पण या अष्टपैलूला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या यादीत किंग्स इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलचा देखील समावेश आहे. मॅक्सवेलने देखील आजवर 87 चेंडूंचा सामना केला ज्यात त्याने 8 चौकारांसह 10 सामन्यात 90 धावा केल्या आहेत. मात्र, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मॅक्सवेल मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि स्टोक्स रॉयल्ससाठी सलामीला येतो.

दुसरीकडे, आयपीएलमध्ये एकही षटकार न मारत चेंडूचा सामना करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता स्टोक्सच्या नावाची नोंद झाली आहे. भारताचे भाष्यकार आकाश चोपडा यांनी शेअर केलेल्या ट्विटनुसार आयपीएलच्या मोसमात षटकार न मारता खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा मनदीप सिंह पहिल्या स्थानावर आहे. 2013 मध्ये मनदीपला 223 चेंडू खेळून एकही षटकार लगवता आला नव्हता. मनदीपऐवजी या यादीत हनुमा विहारी (143 चेंडू), व्हीव्हीएस लक्ष्मण(134 चेंडू), , चेतेश्वर पुजारा (124), केन विल्यम्सन (113) आणि कुमार संगाकारा (105) यांसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.