Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये शिस्तभंग केल्याप्रकरणी भारताची पैलवान विनेश फोगाट निलंबित
विनेश फोगाट (Photo Credit: IANS)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) शिस्तभंग केल्याप्रकरणी भारताची पैलवान विशेन फोगाटला (Vinesh Phogat) अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (Wrestling Federation of India) ही कारवाई केली आहे. भारतीय रेसलिंग फेडरेशनने विनेश फोगाटला 16 ऑगस्टपर्यंत पाठवलेल्या नोटीसवर उत्तर देण्यास सांगितले आहे विनेश सध्या फेडरेशनच्या कोणत्याही क्रीडा उपक्रमात सहभागी होऊ शकत नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनेशला तीन कारणांसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.

टोकियो ऑलिम्पिकदरम्यान विनेश फोटाला भारतीय खेळाडूंसह राहण्यास आणि त्यांच्या सोबत ट्रेनिंग करण्यास नकार दिला होता. विनेश लढतीदरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकृत भागीदार शिव नरेश यांच्या लोगो असलेला ड्रेस परिधान करण्याऐवजी नायकीचा लोगो असलेला ड्रेस घालून मैदानात उतरली होती, असा तिच्यावर दुसरा आरोप आहे. तिसरा आरोप म्हणजे, टोकियोमध्ये विनेश हंगेरियन पैलवानांसोबत ट्रेनिंग घेत होती. परंतु, ज्यावेळी भारतीय महिला पैलवानांशी तिचे ट्रेनिंग शेड्युल लागले, त्यावेळी तिने ट्रेनिंग घेतली नाही. हे देखील वाचा- ENG vs IND: लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची नवी चाल, 'या' अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश

विनेश फोगाट टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदक पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. पण तिचं प्रदर्शन सुरुवातीपासूनच निराशाजनक होते. ती क्वॉर्टरफायनलमध्ये स्पर्धेबाहेर गेली होती. तिला महिलांच्या 53 किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला. विनेशला बेलारूसच्या वॅनेसा कलाडजिंस्कायाने मात दिली होती.