IPL 2022 मध्ये शिखर धवनची (Shikhar Dhawan) बॅट पुन्हा एकदा गरजली. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये धवनची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता आगामी मायदेशात दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. त्याशिवाय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारीही येईल असे समजले जात होता. तथापि 22 मे रोजी बीसीसीआयने (BCCI) 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धवनकडे कर्णधारपद सोडा, त्याला संघातही स्थान मिळाले नाही. आता टीम इंडियात (Team India) धवनची निवड न करण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा होता असे वृत्त समोर येत आहे. द्रविडने संघाची घोषणा करण्यापूर्वी धवनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय संघाचा (Indian Team) भाग नसल्याची फोन करूँ माहिती दिली होती. (Team India: इंग्लंड दौरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; KL Rahul कडे टीमची कमान, Shikhar Dhawan कडे दुर्लक्ष)
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, “शिखर धवन हा भारतीय क्रिकेटचा महान सेवक आहे, परंतु टी-20 मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी द्यायची आहे. राहुल द्रविडने कठोर निर्णय घेतला आणि आम्ही सहमत झालो.संघ जाहीर होण्यापूर्वी राहुल द्रविडने रविवारी शिखर धवनला हे सांगितले होते.” शिखर धवन आयपीएलमध्ये सातत्याने धावा करत आहे, गेल्या 7 हंगामात त्याने सलग 450 पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. तसेच आयपीएल 2022 मध्ये या दिग्गज सलामीवीराने 14 सामन्यांमध्ये 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत. दरम्यान धवनची टी-20 संघात निवड न होणे हे ऑस्ट्रेलियातील आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय व्यवस्थापनाच्या योजनेचा भाग नसल्याचेही थेट संकेत आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेसाठी अर्शदीप सिंह, उमरान मलिक, ऋतुराज गायकवाड आणि हर्षल पटेल या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक सारखे ज्येष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. लक्षणीय आहे की उमरान मलिक आणि अर्षदिप सिंह यांची प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अर्षदिपने डेथ ओव्हर्समध्ये आपल्या सातत्यपूर्ण गोलंदाजीने प्रभावित केले. तर जम्मू-काश्मीरचा मलिक सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मात्र आता या दोन्ही आयपीएलच्या स्टार खेळाडूंना संधी मिळणार की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.