IPL 2021 Resumption: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याच्या बीसीसीआय (BCCI) सध्या धडपडीत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका एक आठवडापूर्वी सुरु करण्याची इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) विनंती केली आहे जेणेकरून आयपीएलसाठी (IPL) सप्टेंबर महिन्यात विंडो तयार होऊ शकेल. 18 जूनपासून साऊथॅम्प्टन (Southampton) येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर टीम इंडिया (Team India) व यजमान इंग्लंड (England) संघात 5-कसोटी सामन्यांच्या मालिका 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळली आहे. WTC फायनल नंतर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी जुलै महिन्यात भारतीय खेळाडू यूकेमध्ये राहतील. Espncricinfo.com च्या माहितीनुसार बीसीसीआयच्या विनंतीला ईसीबीने अद्याप प्रतिसाद दिला नाही. (IPL 2021 Resumption: आयपीएल पुन्हा सुरु करण्याबाबत सौरव गांगुलीने दिले संकेत, न झाल्यास होणार हजारो कोटींचं नुकसान)
दिल्ली आणि अहमदाबाद येथे बायो-बबल उल्लंघनानंतर काही खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झाल्यावर आयपीएल 4 मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. अंतिम कसोटी सामना 7 सप्टेंबरला संपल्यास उर्वरित आयपीएलचे 31 सामने खेळण्यासाठी तीन आठवड्याची विंडो पुरेशी असेल. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ भारतात दाखल होण्यापूर्वी आयपीएल पूर्ण करण्यासाठी अनेक डबल-हेडरचा समावेश करण्याच्या बीसीसीआय विचारात आहे. 18 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धा स्थगित करण्यापूर्वी भारतात 29 सामने खेळले गेले होते. उल्लेखनीय म्हणजे, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या महिन्याच्या सुरूवातीला म्हटले होते की, आयपीएल हंगामातील उर्वरित वेळ न झाल्यास मंडळाला 2,500 कोटी रुपयांचे नुकसान होईल. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल 3 इंग्लिश काऊन्टींनी आयपीएलचे उर्वरित इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात रस दर्शवला होता.
दुसरीकडे, 8 ते 20 जुलै दरम्यान इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध 3 वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोविड-19 मुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या द हंड्रेडची उद्घाटन आवृत्ती 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत खेळली जाणार आहे.