IND vs ENG Test: आयपीएल 2021 साठी बदलले जाईल इंग्लंड विरोधात टीम इंडियाच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक? ECB ने दिले स्पष्टीकरण
विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

India Tour of England 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) उर्वरित अर्धा भाग पूर्ण करण्यासाठी दोन्ही देशांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली आहे. पण अशा कोणत्याही ‘अधिकृत’ गोष्टी घडल्या नाहीत असे इंग्लंड बोर्डाने (England Cricket Board) स्पष्ट केले आहे. लीगचे उर्वरित 31 सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआय (BCCI) कडून 4 ऑगस्टपासून सुरू होणारी पहिली कसोटी आठवडाभरपूर्वी सुरू करण्याच्या संभाव्य प्रयत्नांविषयी ब्रिटिश माध्यमांनी सुचवले होते. तथापि, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) म्हटले आहे की मूळ वेळापत्रक पाळण्याचे त्यांचे नियोजन आहे कारण त्यांच्या भारतीय सहकार्यांनी अद्याप बदल करण्याची अधिकृत विनंती केलेली नाही. (IPL 2021 चा दुसरा टप्पा आयोजित करण्यासाठी BCCI ची धडपड, ECB कडे टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदलाची केली विनंती)

“आम्ही बीसीसीआयशी नियमितपणे विविध मुद्द्यांविषयी बोलतो, खासकरुन आम्ही कोविड-19 च्या आव्हानांना सामोरे जाताना पण तारखा बदलण्याची अधिकृत विनंती केली नव्हती आणि ठरल्याप्रमाणे पाच कसोटी मालिकेसाठी योजना आखत आहोत,” वेळापत्रकात संभाव्य बदलाबाबत पीटीआयने विचारले असता ईसीबी प्रवक्त्याने सांगितले.2021 ची आयपीएल आवृत्ती पूर्ण न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचं बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने यापूर्वी स्पष्ट केले होते. लीगमधील बायो-बबलमध्ये कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेल्यावर आयपीएलची यंदाची आवृत्ती अलीकडेच पुढे ढकलण्यात आली. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि प्रख्यात क्रिकेट लेखक माइकल अ‍ॅथर्टन यांनी 'द टाइम्स' च्या स्तंभात असे म्हटले की पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल पूर्ण करण्यासाठी इंग्लिश ग्रीष्मातील अंतिम कसोटी स्थानांतरित होण्याच्या शक्यतेबाबत बीसीसीआयने चौकशी केली आहे.

दुसरीकडे, बीसीसीआयच्या सूत्रांकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की बोर्ड निश्चितच पर्यायांचा शोध घेत आहे परंतु ईसीबीकडे अधिकृतपणे संपर्क साधलेला नाही. आतापर्यंत ठरल्यानुसार कसोटी मालिकेचा अंतिम सामना ओल्ड ट्रॅफर्डवर रंगणार आहे. टीम इंडिया 18 ते 22 जूनपर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. यांनतर इंग्लंड विरोधात 4 ऑगस्टपासून कसोटी मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे, परंतु ईसीबी आणि बीसीसीआय दोघांनी आता हे स्पष्ट केले आहे की मालिका नियोजितप्रमाणे पुढे जाईल, अंतिम सामना मॅंचेस्टर येथे 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.