भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

वेलिंग्टनच्या (Wellington) बेसिन रिझर्व्ह मैदानावर नुकत्याच संपुष्टात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने (New Zealand) भारताला (India) 10 विकेटने पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंड संघाने आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिप (ICC Test Championship) स्पर्धेत आघाडी मिळविली आहे. टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्ध या विजयासह एकूण 60 गुण मिळवले आणि चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान सुधारले आहे. आणि मोठ्या फरकाने पराभव झाला असूनही भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिप स्पर्धेत सलग सात सामने जिंकल्यानंतर भारताचा विजयी रथ न्यूझीलंडविरुद्ध थांबला आहे. वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 165 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 191 धावा करून ऑलआऊट झाला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा केल्याने 183 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली होती. चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघासमोर भारताने अवघ्या 9 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे विजयी संघाने एकही गडी गमावल्याशिवाय मिळवले. (IND vs NZ 1st Test: वेलिंग्टन सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने 10 विकेटने विजय मिळवत रचला इतिहास)

भारताविरुद्ध या विजयामुळे न्यूझीलंडला कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. किवी संघ आता 120 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी, तो 60 गुणांसह श्रीलंकेच्या खाली सहाव्या क्रमांकावर होता. आता किवी संघ टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. या क्षणी विराट आर्मी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल आहे. भारताने एकूण आठ सामने खेळले असून त्यापैकी सात सामने जिंकले आणि एकूण 360 गुण मिळवले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे ज्याने 10 सामन्यांपकी सात सामने जिंकले आहेत. तिसरे स्थान इंग्लंडच्या संघाचे आहे, ज्यांनी 9 पैकी पाच सामने जिंकले आहेत.

भारत-न्यूझीलंडमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये एकूण 120 गुण मिळणार आहेत. म्हणजे एक सामना जिंकण्यासाठी 60 गुण. पहिला सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंडने 60 गुणांची कमाई केली असून दुसर्‍या सामन्यातही यजमान संघाने विजय मिळवला तर ते इंग्लंड आणि पाकिस्तान या दोघांनाही 180 गुणांनी मागे टाकून तिसर्‍या स्थानावर पोहोचू शकतात.