शाहरुख खान क्रिकेटर (Photo Credit: Instagram)

IND vs WI 2022: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय ताफ्यात दोन बदल झाले आहेत. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आर साई किशोर (R Sai Kishor) ही तामिळनाडू (Tamil Nadu) जोडी  आगामी सहा सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय व्हाईट-बॉल संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून सामील होणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शाहरुख आणि साई किशोर दोघांनीही तामिळनाडूच्या फायनल सामान्यांपर्यंतच्या मोहिमेत मोठा वाटा उचलला. मुख्य पथकातील एखाद्या खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह येण्याचा धोका लक्षात घेता एक सावधगिरीचा उपाय म्हणून दोघांचा भारतीय ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेची सुरुवात अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारी रोजी तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्याने होईल आणि त्यानंतर कोलकाता येथे तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. (IND vs WI ODI 2022: व्यंकटेश अय्यरच्या जागी टीम इंडिया आता वेस्ट इंडियजविरुद्ध ‘या’ फिनिशरला आजमावणार, मोठे फटके खेळण्यात आहे माहीर)

“होय, शाहरुख आणि साई किशोर यांना विंडीज मालिकेसाठी स्टँड-बाय म्हणून बोलावण्यात आले आहे. ते मुख्य संघातील खेळाडूंसह बबलमध्ये प्रवेश करतील,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTI ला पुष्टी केली. सध्या कोरोनाची प्रकरणे खूप जास्त प्रमाणात समोर येत आहेत आणि बहुतेक मालिकांच्या मध्यभागी अनेक संघांच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही भारतीय खेळाडूला संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.

साई किशोर दुसऱ्यांदा भारतीय संघात सामील होणार आहे. यापूर्वी श्रीलंका दौऱ्यात त्याचा भारतीय संघात नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. दुसरीकडे, शाहरुख खान भारताच्या मुख्य संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत होता, मात्र आता त्याला राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर शाहरुख खान महत्त्वाच्या प्रसंगी तामिळनाडूसाठी सातत्याने धावा करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने कर्नाटकविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याच सामन्यात साई किशोरने तीन विकेट घेतल्या. शाहरुखने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकविरुद्ध 39 चेंडूंत 79 धावा आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध अंतिम सामन्यात 21 चेंडूंत 42 धावा केल्या.