IND vs WI ODI 2022: व्यंकटेश अय्यरच्या जागी टीम इंडिया आता वेस्ट इंडियजविरुद्ध ‘या’ फिनिशरला आजमावणार, मोठे फटके खेळण्यात आहे माहीर
दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर (Photo Credit: Instagram, Twitter)

हार्दिक पांड्याची दुखापत सध्या टीम इंडियासाठी (Team India) मोठी डोकेदुखी बनली आहे. हार्दिक दुखापतीमुळे भारतीय संघातून (Indian Team) बाहेर पडल्यापासून निवड समिती वनडे संघात वेगवेगळ्या अष्टपैलू खेळाडूंना आजमावत आहे. हार्दिकच्या जागी रवींद्र जडेजा अष्टपैलूची जबाबदारी सांभाळत होता, पण त्याला दुखापत झाल्याने एकदिवसीय भारतीय संघात व्यंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) वर्णी लागली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अय्यरने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. संघ अडचणीत असताना त्याला बॅटने प्रभाव पडता आला नाही तर Proteas विरुद्ध दोन सामन्यांमध्ये अधिक गोलंदाजीची संधीही मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) व्यवस्थापनाने वेंकटेश अय्यरला सहाव्या क्रमांकावर पाठवले, जो आयपीएलमध्ये KKR साठी सलामीला उतरतो आणि निकाल आपल्या समोर आहे. (IND vs WI Series 2022: भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा ODI संघ जाहीर, केमार रोच आणि Nkrumah Bonner चे पुनरागमन)

आता जेव्हा अय्यर अपेक्षापूर्ती करू शकला नाही तेव्हा त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे संघातूनही वगळण्यात आले. आणि आता त्याच्या जागी हरियाणाकडून रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या दीपक हुडाला  (Deepak Hooda) संधी देण्यात आली आहे. दीपक हुडाची विशेषता म्हणजे तो मोठे फेटकबाजी करण्यात माहीर आहे आणि ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो. 26 वर्षीय हुडाने हरियाणाकडून आतापर्यंत खेळलेल्या 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 42.76 च्या सरासरीने 2908 धावा केल्या आहेत आणि त्याने फक्त 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए (देशांतर्गत एकदिवसीय) सामन्यांमध्ये हुडाने 74 सामन्यांच्या 67 डावांमध्ये 38.25 च्या सरासरीने 2257 धावा केल्या आहेत. नाबाद 293 ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यामध्ये त्याने चार शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत.

एकूणच निवडकर्त्यांना नवा फिनिशर सापडला आहे जो कदाचित सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, पण यासाठी हुडाला नियमित संधी मिल्ने गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आता विंडीजविरुद्ध हुडा किती मोठे फटके मारतो हे पाहावे लागेल. दुसरीकडे, आयपीएलमध्ये हुडाच्या खेळाबद्दल बोलायचे तर हुडा 2014 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळत आहे. त्याने 80 आयपीएल सामन्यांमध्ये 130 च्या स्ट्राइक रेटने 785 धावा केल्या आहेत. त्याने 28 डावात गोलंदाजी करताना नऊ विकेट्सही घेतल्या आहेत.