टीम इंडिया (Photo Credit: AP/PTI)

क्रिकेटच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिज (West Indies) च्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी खेळाडू घाबरायचे. टीम इंडिया (Team India) विरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या मालिकेत भारतीय संघाने विंडीजविरुद्ध दुसरा कसोटी सामना तब्बल 257 धावांनी जिंकला. यासह भारताने 2-0 ने विंडिंजवर क्लीन स्विप देत मालिका खिशात घातली. याआधी टीम इंडियाने टी-20 आणि वनडे मालिकेतही विडिंजचा धुव्वा उडवला होता. दुसऱ्या सामन्यात भारतानं दिलेल्या 468 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीज संघाला 210 धावांपर्यंत मजल मारता आली. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही संघाकडून काही विक्रमांची नोंद करण्यात आली. (IND vs WI 2nd Test: टीम इंडियाच्या गालंदाजांची चमकदार कामगिरी, वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेत क्लीन-स्वीप पूर्ण)

भारत (India) आणि विंडीजमध्ये झालेल्या जमैका येथील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विंडीजकडून दुसर्‍या डावात 12 खेळाडूंनी फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच असे झाले आहे जेव्हा एका डावात 11 हून अधिक फलंदाज एका डावात सहभागी झाले होते. त्यामुळे 11 पेक्षा जास्त क्रिकेटपटू कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्वरूपात सामील होण्याची ही पहिली वेळ ठरली. डॅरेन ब्राव्हो (Darren Bravo) याला दुखापत झाल्यावर जेर्मेन ब्लॅकवुड (Jermaine Blackwood) याने त्याची जागा घेत विंडीजसाठी 12 वा खेळाडू म्हणून मैदानात उतरला. दुखापतीमुळे माघार घेण्यापूर्वी ब्राव्होने 23 धावा केल्या होत्या. आणि त्याच्या जागी आलेल्या ब्लॅकवुडने 38 धावा केल्या.

विंडीजकडून शामरा ब्रूक्स याने दुसऱ्या डावात सर्वाधिक 50 धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डर याने 39 तर ब्लॅकवूडने 38 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्मा याने 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या बुमराहनं दुसऱ्या डावात एक गडी बाद केला. विंडीजविरुद्ध दोन सामन्यांची मालिका जिंकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. या विजयासह चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात 120 गुणांसह टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावलं आहे.