भारताने जर, 4 गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीचा अवलंब केला तर रोहित आणि रहाणे या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल. पण जर संघ पाचव्या तज्ज्ञ गोलंदाजाला खेळवण्याचा निर्णय घेतला तर रोहितला संघात स्थान मिळणे अवघड दिसत आहे. संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घेणे सोप्पे होणार नाही. टीम इंडियाने जुन्या डावपेचांचे अनुसरण केले तर मयंक अग्रवाल आणि केएल राहुल सलामीला येऊ शकतात. पण, खराब फॉर्ममुळे गेल्या दोन सामन्यात राहुलला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नसल्याने हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला सलामी पाठवण्यात आले होते.
दुसरीकडे, मागील टेस्टमध्ये रोहितने नाबाद अर्धशतक केले होते. शिवाय, सराव सामन्यातही त्याने अर्धशतक ठोकले होते, त्यामुळे टीम व्यवस्थापनाला त्याला पहिल्या टेस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चितपणे स्थान देण्याचा विचार करू शकते. याशिवाय कसोटीतील रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याचा फलंदाजीचा रेकॉर्ड पाहता त्याला कुलदीप यादव याच्या तुलनेत अधिक पसंती दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करू शकतात.