संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd ODI 2021: कोलंबो (Colombo) भारतीय संघाने (Indian Team) पावसाने बाधित झालेल्या तिसऱ्या व अंतिम वनडे सामन्यात पहिले फलंदाजी करून 43.1 ओव्हरमध्ये 225 धावा केल्या आणि यजमान श्रीलंकेला (Sri Lanka) विजयासाठी 226 धावांचे टार्गेट दिले आहे. श्रीलंकन गोलंदाज विशेषतः फिरकीपटूंसमोर टीम इंडिया (Team India) फलंदाज अक्षरशः गारद झाले आणि आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारू शकले नाही. श्रीलंकेकडून अकिला धनंजय आणि प्रवीण जयविक्रम या फिरकी जोडीने प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या तर दुशमंत चमीराला दोन,  कर्णधार दासुन शनाका व चमिका करुणारत्ने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दुसरीकडे, भारताकडून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी चांगली सुरुवात केली पण मोठी खेळी करू शकले नाही. पृथ्वीने 49 धावा केल्या तर पदार्पणवीर सॅमसन 46 धावाच करू शकला. तसेच सूर्यकुमार यादवने 40 धावांचे योगदान दिले. (IND vs SL 3rd ODI 2021: टॉस जिंकल्यानंतर शिखर धवनने ‘कबड्डी शैली’मध्ये साजरा केला आनंद, काही वेळातच व्हिडिओ व्हायरल)

श्रीलंकन गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांवर नियंत्रण ठेवले होते. यजमान संघाचे गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत असताना एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतकी धावसंख्या गाठू दिली नाही. विशेष म्हणजे आजच्या सामन्यातून भारताकडून पाच खेळाडूंनी वनडे पदार्पण केले पण सॅमसन वगळता एकही अन्य फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाही. नितीश राणा (Nitish Rana) 7 तर कृष्णप्पा गौतम 2 धावाच करू शकले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आजच्या सामन्यात देखील कमाल करू शकला नाही. हार्दिक 19 धावा करून बाद झाला. तसेच कर्णधार शिखर धवनही 13 धावा करून माघारी परतला. पदार्पणवीर राहुल चाहरने 13 धावा आणि नवदीप सैनीने (Navdeep Saini) 15 धावा केल्या.

धवन ब्रिगेडने 2-0 ने मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून श्रीलंका संघाला व्हाईट वॉश देण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी श्रीलंका संघ जीवाचे रान करेल. तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी 5 नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये सॅमसन आणि राहुल चाहर या टी-20 खेळलेल्या खेळाडूंचा तर गौथम, नितीश राणा आणि चेतन सकारिया या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.