IND vs SL 2nd T20I: कोलंबो (Colombo) येथील पहिल्या टी-20 सामन्यात 38 धावांनी यजमान श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दणदणीत विजयानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) दुसऱ्या सामन्यासह मालिका खिशात घालण्यासाठी आज मैदानात उतरेल. आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मुळतः 27 जुलै रोजी खेळला जाणारा सामना भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर एक दिवसासाठी म्हणजेच 28 जुलैसाठी पुढे ढकलण्यात आला. कृणाल पांड्याने पहिल्या टी-20 सामन्यात बॉलने संघाला चांगली मदत पुरवली होती त्यामुळे आता दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्या जागी फिरकीपटू राहुल चाहर (Rahul Chahar) आणि अष्टपैलू कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham) असे दोन उपयुक्त पर्याय धवन ब्रिगेडकडे उपलब्ध आहे. (IND vs SL T20I: कोविड-19 पॉझिटिव्ह कृणाल पांड्या श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेतून आऊट, संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंचा अहवाल जाहीर, जाणून घ्या)
श्रीलंकेविरुद्ध भारताच्या फलंदाजी क्रमवारीत बदल होताना दिसत नाही. कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला उतरतील. धवनने पहिल्या सामन्यात 46 धावांची खेळी केली होती तर पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वी पहिल्याच चेंडूवर माघारी परतला त्यामुळे आजच्या दुसऱ्या सामन्यात तो आक्रमक फलंदाजी करताना दिसु शकतो. शिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांचे स्थान कायम राहील. ईशान पुन्हा एकदा सॅमसनच्या पुढे विकेटकिपिंग करेल. हार्दिक पांड्या संघाचा मुख्य अष्टपैलू असेल. तर कृणालच्या जागी संघ व्यवस्थापन आता पर्यंत 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राहुल चाहर किंवा अष्टपैलू के गौथमला टी-20 पदार्पणाची संधी देऊ शकते. यजमान संघाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात राहुल चाहरची फिरकी गोलंदाजी पाहता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच गोलंदाजी विभागात दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती व युजवेंद्र चहल यांच्या स्थानाला कोणताही धोका दिसत नाही आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरु होईल तर टॉस अर्धातास पूर्वी म्हणजे 7:30 वाजता होईल.
भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौथम/राहुल चाहर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, आणि वरुण चक्रवर्ती.