रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मोहाली कसोटीचा (Mohali Test) दुसरा दिवस पूर्णपणे फक्त एकाच खेळाडूच्या नावावर राहिला - रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja). सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या या स्टार अष्टपैलूने संस्मरणीय खेळी खेळून इतिहास रचला. बॉलने नेहमीच छाप पाडणाऱ्या जडेजाने कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळताना नाबाद 175 धावा चोपल्या. त्याला द्विशतक झळकावण्याची संधी होती पण त्याला द्विशतकी पल्ला पूर्ण करण्याची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत भारतीय संघाने 574/8 धावांवर डाव घोषित केला. पण दिवसाचा खेळ संपल्यावर जडेजाने खुलासा केला आहे की खेळपट्टीच्या मदतीचा फायदा घेता यावा यासाठी संघाने डाव घोषित करावा अशी त्याने सूचना दिली होती. (IND vs SL 1st Test: दोन दुहेरी शतकाची अधुरी कहाणी; जडेजा याच्यावर झालेल्या अन्यायामुळे नेटकऱ्यांना आठवलं सचिन तेंडुलकरचे 'ते' दुखणं)

सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतकाजवळ नाबाद परतलेल्या जडेजाने शनिवारी पीसीए स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी आपला डाव नेला आणि जबरदस्त फलंदाजी केली. 228 चेंडूंच्या संपूर्ण डावात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. टी-ब्रेकच्या अगदी आधी, जेव्हा तो दुहेरी शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. अशा स्थितीत दिवसाचा खेळ संपल्यावर जडेजाला याबाबत प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, प्रत्यक्षात ही त्याचीच सूचना होती. जडेजा म्हणाला, “मी त्यांना (संघाला) सांगितले की खेळपट्टीवर ‘व्हेरिएबल बाउन्स’ आहे आणि चेंडू वळू लागला आहे. म्हणून मी संदेश पाठवला की खेळपट्टीवरून काही मदत मिळू शकते आणि मी सुचवले की आपण त्यांना (श्रीलंकेला) आता फलंदाजीसाठी आणले पाहिजे.”

भारतीय संघ व जडेजाच्या या योजनेचा फायदा झाला आणि संघाने शेवटच्या सत्रात श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 4 विकेट्स घेतल्या, ज्यात स्वतः जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची अवस्था 108/4 अशी झाली असून ते भारताच्या आणखी 466 धावांनी पिछाडीवर आहेत. अशा परिस्थितीत आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज शिल्लक विकेट घेऊन पाहुण्या संघाला आणखी दबावात आणून संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याच्या प्रयत्नात असतील.