IND vs SA T20I 2022: विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेतून मिळणार आराम? असे झाल्यास ताबडतोड फलंदाजी करणारा ‘हा’ बनू शकतो नंबर 3 चा दावेदार
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA T20I 2022: जगातील सर्वात मोठ्या फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली (Virat Kohli) एका वर्षाहून अधिक काळ बॅटने तुफान धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. टीम इंडिया (Team India)जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्यामुळे आयपीएल  (IPL) 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेमधून (South Africa Series) विश्रांती दिली जाऊ शकते असे दिसत आहे. भारतीय संघ आयपीएलच्या समाप्तीनंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडशी भिडणार आहे. या मालिकेतून अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे तर काही नवख्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेजमेंट हा बीसीसीआयच्या  (BCCI) अजेंडाचा सर्वात मुख्य भाग आहे आणि म्हणूनच आयपीएलच्या कठीण हंगामानंतर संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. (IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी BCCI कडून स्थळांची घोषणा; 5 ठिकाणी खेळले जाणार पाच सामने)

दरम्यान, जर विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आराम दिला गेला तर त्याच्या जागी स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवले जाऊ शकते. सध्या अय्यर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. श्रेयस अय्यरने आयपीएल 2022 मध्ये 8 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. अय्यरकडे कोणत्याही विकेटवर फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे. अशा परिस्थितीत कोहलीच्या जागी अय्यर तिसऱ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार बनू शकतो. लक्षणीय आहे की विराटच्या जागी श्रेयसला मायदेशात श्रीलंका मालिकेत संधी मिळाली होती. अय्यरने दोन्ही हातांनी संधीच सोनं केलं आणि श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून 204 धावा केल्या. यादरम्यान त्याने सलग तीन अर्धशतक झळकावले.

निवडकर्ते विराटशी त्याच्या फॉर्मबद्दल तसेच भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे. BCCI चे काही अधिकारी कोहलीला एक फॉर्मेट सोडायचा आहे का? असेही विचारणार असल्याचे अहवालात असाही दावा करण्यात आला आहे. विशेषत: यंदाच्या टी-20 विश्वचषकच्या पार्श्वभूमीवर कोहलीच्या फॉर्मची चिंताही तीव्र होत चालली आहे. कोहलीकडे परिस्थिती बदलण्यासाठी पुरेसा वेळ असला तरी निवडकर्त्यांची चिंता वाढली जात आहे.