टीम इंडिया (Photo Credit: PTI)

मायदेशात न्यूझीलंडचा सफाया केल्यावर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांशी भिडणार आहे. यंदा महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वात 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माकडे कसोटी संघाचा उपकर्णधार पदाची कमान सोपवण्यात आले आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे तीन मोठे मॅचविनर या मालिकेतून बाहेर पडले आहेत. BCCI ने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), फिरकीपटू अक्षर पटेल आणि सलामीवीर शुभमन गिल यांना वगळता 18 जणांचा संघ जाहीर केला आहे. या तीनही खेळाडूंना तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे दौऱ्यावर संधी मिळालेली नाही. (SAvIND Test Series: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCI ने जाहीर केला संघ)

हे तिन्ही खेळाडू संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल किंवा मयंक अग्रवाल युवा सलामीवीर शुभमन गिलची जागा भरण्यासाठी सक्षम आहेत. मात्र एवढ्या मोठ्या मालिकेतून जडेजाचे बाहेर पडणे हा मोठा धक्का आहे. तसेच अलीकडच्या काळात अक्षर पटेल कसोटी क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचा अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला आहे, त्याची योग्यता सर्वच जाणून आहेत. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर या खेळाडूंची कमतरता भरून काढणे नवीन खेळाडूंसाठी नक्कीच आव्हानात्मक ठरेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर परतले आहेत. बुमराह-शमी वेगवान गोलंदाजी विभागात भारतीय संघाला मजबूत करतील. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना साथ देतात. अशा स्थितीत दोन्ही गोलंदाज आपल्या कामगिरीने कहर करू शकतात.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.