IND vs SA ODI 2022: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) वनडे मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. सात वर्षांतील ही पहिलीच मालिका असेल ज्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधार नाही आणि तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळेल. तसेच केएल राहुल (KL Rahul) प्रथमच वनडे कर्णधार म्हणून दिसणार आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांची मालिका ही भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवातही ठरणार आहे. टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत फक्त एकदाच एकदिवसीय मालिका जिंकली आहे. कोहलीच्या नेतृत्वात 2018 मध्ये टीम इंडियाने हा पराक्रम केला होते. यावेळी संघात अनेक नवे खेळाडू असून फलंदाजीत भारताची स्थिती कमकुवत दिसत आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेशी भिडण्याचा अनुभवही नाही आहे. (IND vs SA 1st ODI 2022: वनडे पदार्पणासाठी Venkatesh Iyer सज्ज, चौथ्या क्रमांकासाठी दोन खेळाडूंमध्ये चुरस; वाचा सविस्तर)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे खेळण्याचा अनुभव असलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये फक्त शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली आणि श्रेयस अय्यर आहेत. कर्णधार राहुल देखील यापूर्वी खेळला आहे पण त्याच्या नावावर फक्त एकच सामना आहे. रिषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव हे फलंदाज आहेत पण त्यापैकी कोणीही दक्षिण आफ्रिकेचा वनडेत अद्याप सामना केलेला नाही. तसेच त्यांना जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजीची मदार या वेळी धवन आणि कोहली, या ज्येष्ठ खेळाडूंवर असेल. आता टीम इंडिया पार्लच्या बोलंड पार्कमध्ये उतरेल तेव्हा या खेळाडूंपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते हे पाहावं लागेल. संघ व्यवस्थापनावर परिस्थितीनुसार योग्य संयोजन निवडण्याचे दडपण असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी सध्याच्या फलंदाजांमध्ये फक्त विराट कोहली आणि शिखर धवन यांची कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली राहिली आहे. कोहलीने 27 सामन्यात 64.35 च्या सरासरीने 1287 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने चार शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. तर धवनने Proteas संघाविरुद्ध खेळलेल्या 18 सामन्यात 49.87 च्या सरासरीने 798 धावा असून यामध्ये तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, या दौऱ्यावर संघाची कमान सांभाळणारा राहुलने एक सामना खेळला आहे, मात्र त्यात तो केवळ 26 धावा करू शकला आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरला तीन सामन्यांत 48 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे धवन-कोहली यांच्यावर अवलंबून दोघे फ्लॉप ठरल्यास मालिका भारतीय संघाच्या हातातून निसटू शकते. या मालिकेत सलामीची जबाबदारी राहुल आणि धवनवर असेल. दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवमध्ये मधल्या फळीसाठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.