IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला CSA चा दिलासा; कोविड-19 बूस्टर डोससह, देशात Omicron ची परिस्थिती बिघडल्यास एक्झिटचे दरवाजे ठेवले खुले- Reports
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार आढळून आल्याच्या वृत्तानंतर भारताचा दौरा (India Tour) धोक्यात असल्याचेही म्हटले जात आहे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फक्त आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि वनडे व कसोटी मालिका अबाधित ठेवली आहे. भारतीय संघ (Indian Team) आधीच दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून 26 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तयारी करत असताना, संभाव्य कोविड-19 परिस्थितीबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) कडून बोर्डाला हमी मिळाल्याचे कळत आहे. बहुप्रतीक्षित कसोटी आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी CSA ने अतिरिक्त प्रयत्न केले आहेत. (SA vs IND Test 2021-22: भारताविरुद्ध रोमांचक बॉक्सिंग डे कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेने कंबर कसली, पहिल्या नेट सत्रात केला जोरदार सराव)

News 24 मधील वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेतील कोविड-19 ची परिस्थिती बिघडत असताना CSA ने बीसीसीआयला दौरा मध्यंतरी सोडण्याची परवानगी दिली आहे. इतकंच नाही तर देशातील व्हायरस संदर्भात चिंताजनक परिस्थिती असूनही गरज भासल्यास बोर्डाने भारतीय खेळाडूंना बेडची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. न्यूज पोर्टलनुसार, CSA ने भारतीय खेळाडूंना कोविड-19 लसीचे बूस्टर शॉट्स देखील ऑफर केले आहेत जेणेकरून त्यांना संभाव्य संसर्गापासून अधिक सुरक्षित वाटावे. तसेच बायो-बबलमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी बोर्डाने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने प्रेक्षकांना 3 कसोटी आणि एकदिवसीय मालिकेला उपस्थित राहण्यास मनाई केली व ओमिक्रॉनच्या भीतीमुळे तिकिटे विकली नाहीत.

दरम्यान असेही कळले आले की CSA ने दक्षिण आफ्रिकेच्या सरकारसोबत काम केले आहे जेणेकरून टीम इंडियाने कोविडच्या वाढत्या परिस्थितीबद्दल चिंता न करता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेल. उल्लेखनीय म्हणजे नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मायदेशातील वनडे मालिका गेल्या महिन्यात निलंबित करण्यात आली होती, तर CSA ने कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे देशांतर्गत सामनेही निलंबित केले आहेत.