भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credits: Getty Images)  

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने पहिला डाव पाच बाद 601 धावांवर घोषित केला, त्याउलट दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजीला येत आफ्रिका संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. आणि त्यांचे तीन सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर, तिसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला दोन आफ्रिकी फलंदाजांना बाद करत विरोधी संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण, कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याने क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्या साथीने सावध फलंदाजी करत डाव सावरला. डू प्लेसिसने यादरम्यान त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि तो 64 धावांवर बाद झाला. (IND vs SA 2nd Test 2019: दुसऱ्या टेस्ट दरम्यान रोहित शर्मा याच्या चाहत्याने केले असे काम की अजिंक्य रहाणे यालाही झाले हसू अनावर, पहा Photo)

डी कॉकही त्याच्या कर्णधाराला जास्त काळ साथ देऊ शकला नाही आणि रविचंद्रन अश्विन याच्या चेंडूवर बोल्ड झाला. डी कॉकला बाद करत अश्विनने आफ्रिकेला सहावा झटका दिला. यांच्यानंतर सेनुरान मुथुसामीही 7 धावांवर माघारी परतला. आफ्रिकेचा सर्व दिग्गज फलंदाज बाद झाले असताना असे दिसत होते की अन्य फलंदाजदेखील लवकर बाद होतील. पण, वर्नोन फिलेंडर (Vernon Philander) आणि केशव महाराज (Keshav Maharaj) यांनी शतकी भागीदारी केली आणि आफ्रिकेने 250 धावांचा टप्पा गाठला. केशवने यादरम्यान कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले. दोघांची भागीदारी मोडण्यासाठी गोलंदाजांना खूप परिश्रम करावे लागले पण, अखेरीस अश्विनने केशवला रोहित शर्माकडे 72 धावांवर झेल बाद केले. यांच्यानंतर फिलेंडर44 धावांवर नाबाद राहिला. कगिसो राबाद (Kagiso Rabada) याला बाद करत रवींद्र जडेजा याने शेवटची आफ्रिकी फलंदाजाला बाद केले.

टीम इंडियासाठी अश्विनने 4, उमेश यादव याने 3, मोहम्मद शमीने 2 तर जडेजाने एक विकेट घेतली. यापूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहली याने तुफानी द्विशतक केले आणि संघाने 600 धावांचा टप्पा गाठला.