IND vs SA 2022: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) स्टार खेळाडूंशिवाय पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर केएल राहुल टीमचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 37 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्याच्या भारतीय टी-20 संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे आणि आगामी मालिकेत तो संघासाठी 'एक्स फॅक्टर' ठरू शकतो. आयपीएल (IPL) 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी फिनिशरची भूमिका बजावल्यानंतर तो आता टीम इंडियामध्येही ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. (IND vs SA Series 2022: श्रेयस अय्यरच्या निशाण्यावर रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम, ‘या’ प्रकरणात बनू शकतो भारताचा तिसरा खेळाडू)
कार्तिक हा केएल राहुलच्या सध्याच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील तो एकमेव क्रिकेटर आहे, जो 16 वर्षांपूर्वी भारतासाठी पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. भारतीय संघाने 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाची सुरुवात केली. कार्तिकने या सामन्यात 31 धावांची नाबाद खेळी खेळली आणि तो भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर ठरला. तीन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा कार्तिक पहिल्यांदाच घरच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याने फेब्रुवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. कार्तिकला आयपीएल 2022 मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला आणि भारतीय संघाचा नवा फिनिशर म्हणून उदयास आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला प्ले ऑफमध्ये नेण्यात कार्तिकचा मोलाचा वाटा होता. त्याने 16 सामन्यात 55 च्या सरासरीने आणि 183.33 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. कार्तिक आता दक्षिण आफ्रिका मालिकेतही ही कामगिरी सुरू ठेवण्यासाठी सज्ज असेल. कार्तिकने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 32 सामन्यांत 33.25 च्या सरासरीने 399 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने विकेटच्या मागे 14 झेलही घेतले आहेत आणि पाच स्टंपिंगही केले आहेत.
दरम्यान 5 जून रोजी भारतीय खेळाडू दिल्लीला पोहोचले आणि 6 जून रोजी संध्याकाळी टीम इंडिया खेळाडूंनी सराव सत्रात भाग घेतला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या नेट सत्रात कर्णधार केएल राहुल, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि श्रेयस अय्यर यांच्यासह उर्वरित खेळाडूंनी जोरदार फलंदाजी केली. त्याचबरोबर गोलंदाजांनीही आपला वेग कायम ठेवत नेटमध्ये हजेरी लावली. एकूणच, टीम इंडियाने टी-20 मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे, कारण यानंतर सतत सामने होणार आहेत आणि अशा परिस्थितीत जास्त सराव सत्रे होणार नाहीत.