IND vs SA Series 2022: श्रेयस अय्यरच्या निशाण्यावर रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम, ‘या’ प्रकरणात बनू शकतो भारताचा तिसरा खेळाडू
श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st T20I: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) जवळपास 2 महिन्यांनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत टीम इंडिया (Team India) 9 जूनपासून नवी दिल्ली येथे 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सामना करण्यासाठी सज्ज आहे. यासह टी-20 विश्वचषकासाठी भारताच्या तयारीची सुरुवात घरच्या मालिकेतून होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारताचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह मोठ्या नावांच्या अनुपस्थितीत, फलंदाजीचा भार सामायिक करण्याची जबाबदारी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हार्दिक पंड्या, ऋषभ पंत आणि यांसारख्या खेळाडूंवर असेल. दिनेश कार्तिकसह हार्दिक आणि राहुलने आयपीएल 2022 मध्ये बॅटने प्रभावी कामगिरी केली होती. (IND vs SA T20 Series: टीम इंडिया विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर, दक्षिण आफ्रिका रंगाचा बेरंग करण्याचा करेल पूर्ण प्रयत्न!)

श्रेयस अय्यरकडून भारताच्या मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे कारण सूर्यकुमार यादव देखील दुखापतीमुळे बाहेर बसणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केलेला अय्यर टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीच्या जवळ आहे. पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये 1,000 धावा पूर्ण करण्यापासून अय्यर 191 धावा दूर आहे. असे केल्यास श्रेयस हा मैलाचा दगड गाठणारा भारताचा 8वा फलंदाज ठरेल आणि कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, एमएस धोनी, सुरेश रैना आणि युवराज सिंह या भारतीय फलंदाजांच्या एलिट यादीत सामील होईल, ज्यांनी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी किमान 1000 धावा केल्या आहेत.

शिवाय, श्रेयस अय्यरकडे पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1,000 धावांचा टप्पा गाठणारा तिसरा वेगवान भारतीय फलंदाज बनण्याची संधी आहे. अय्यरने 36 सामन्यांत 36.77 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 809 धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली अव्वल आहे, ज्याने 29 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या आहेत. तर राहुलने 32 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. त्याचवेळी रोहित शर्माने 47 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत आता श्रेयसला रोहितला मागे टाकण्याची संधी आहे कारण त्याने 36 सामन्यात 809 धावा केल्या आहेत. दरम्यान, अय्यर भारतासाठी खेळलेल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेचा 3-0 असा धुव्वा उडवताना सलग 3 अर्धशतके ठोकली होती.