IND vs SA T20 Series: टीम इंडिया विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर, दक्षिण आफ्रिका रंगाचा बेरंग करण्याचा करेल पूर्ण प्रयत्न!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA T20 Series: भारतीय संघ (Indian Team) टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. नुकतेच आयपीएल (IPL) 2022 ही संपले. आता यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 9 जून 5 रोजी टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियासाठी (Team India) खूप खास असणार आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकतील. पण हे सर्व टीम इंडियासाठी सोपे होणार नाही कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ असे न होऊ देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या. आतापर्यंत दोन्ही संघांनी मिळून 15 सामने खेळले आहेत ज्यात भारताने 9 सामने जिंकून थोडीशी आघाडी मिळवली तर दक्षिण आफ्रिकेने 6 पैकी 6 जिंकले आहेत. पण दक्षिण आफ्रिकेने भारतात खेळताना 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले होते आणि भारताने फक्त 1 सामना जिंकला होता. (IND vs SA 2022 Series: दक्षिण आफ्रिकेवर ‘हे’ 3 भारतीय धुरंधर पडतील भारी, करतात ताबडतोड फलंदाजी)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला तर तो इतिहास रचेल. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाने आफ्रिकेला पहिल्या सामन्यात पराभूत केले तर भारतीय संघ टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकणारा पहिला संघ बनेल. त्यामुळे भारतासाठी या विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागणार आहे. आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाने सध्या अफगाणिस्तान आणि रोमेनियासह सलग 12 टी-20 सामने जिंकून बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक दरम्यान टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु झाली, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने सलग 9 सामने झिशात घातले.

दुसरीकडे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पाच सामने वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जातील. या टी-20 मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणे अपेक्षित आहे. कारण संघात एकापेक्षा एक जबर्दत खेळाडू आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची कमान केएल राहुलकडे असून लक्षणीय आहे की गेल्या वर्षी Proteas संघाने भारतीय संघाचा कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. अशा परिस्थितीत आता हे लक्षात घेऊन टीम इंडिया या मालिकेत त्या पराभवाचा बदला नक्कीच घेऊ इच्छित असेल.