भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ खराब लाईट आणि पावसामुळे थांबवण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एकही विकेट न गमावता 202 धावा केल्या. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 115, तर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने 84 धावा करून खेळपट्टीवर आहे. दुसऱ्या दिवशी रोहित आणि मयंक खेळ सुरु करतील. पहिल्या दिवशी भारताने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीसाठी आलेल्या रोहित आणि मयंकने भारताला चांगली सुरुवात दिली. खराब प्रकाश पडल्यामुळे चहा नियोजित वेळेच्या काही मिनिटांपूर्वी घेण्यात आला. यानंतर विशाखापट्टणममध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकलेले होते.आणि त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करावा लागला. (IND vs SA 1st Test Day 1: रोहित शर्मा याचे टेस्टमधील चौथे शतक; शिखर धवन, केएल राहुल यांच्यासह 'या' एलिट यादीत झाला समावेश)
या सामन्यात नियमित विकेटकीपर रिषभ पंत याच्या जागी भारताने रिद्धिमान साहा याला स्थान दिले आहेत. साहाने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत शेवटचा कसोटी सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये रोहितने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या सामन्यात रोहितनं 154 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं शतक झळकावले. शिवाय, रोहितने मयंकच्या साथीने पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. लंच ब्रेकच्या आधी रोहितने आणि लंच ब्रेकनंतर मयंकने अर्धशतक पूर्ण केले. मयंकने एका षटकारासह 50 धावांचा टप्पा ओलांडला. मयंकचे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक होते. तर, रोहितने तब्बल 10 डावांनंतर 100 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने 2017 मध्ये नागपूर येथे श्रीलंकाविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते.
पहिल्या डावात, टीम इंडियाने दुपारच्या जेवणापर्यंत कोणतीही विकेट न गमावता 91 धावा केल्या. रोहित 52 आणि मयंक 39 धावांवर नाबाद राहिले. यानंतर दोन्ही खेळाडूंनी चहाच्या वेळेपर्यंत दुसऱ्या सत्रात 111 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज दोन्ही सत्रात प्रभाव पडण्यास अपयशी राहिले. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ही भारताची तिसरी सामना आणि दुसरी कसोटी मालिका आहे. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले.