IND vs SA 1st T20I: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी (Team India) हा सामना खूप खास असणार आहे. आज टीम इंडिया नवा कर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली पहिला टी-20 सामना खेळणार आहे आणि जर हा सामना जिंकण्यात संघ यशस्वी ठरला तर त्यांचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवेल जाईल. होय, आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका संघाने सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे. भारत सध्या अफगाणिस्तान आणि रोमानिया 12 विजयांसह अव्वल स्थानावर आहे. (IND vs SA: सात महिन्यात चौथ्यांदा तडाखेबाज खेळाडू टीम इंडिया ‘बाहेर’, नियमित कर्णधार बनण्याचे स्वप्नांना तडा बसणार?)
टी-20 विश्वचषक 2021 नंतर भारताने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकही सामना गमावलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथम न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला समान फरकाने पराभवाची धूळ चारली. त्याचबरोबर भारताने वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडवर मात करून आपली विजयी घोडदौड सुरु केली. अशाप्रकारे भारताने एकही सामना न गमावता सलग 12 विजय नोंदवले आहेत, आणि जर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आज आणखी एक विजय नोंदवला, तर तो सलग 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ बनेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी संघाची धुरा सलामीवीर केएल राहुलकडे सोपवली, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी हा खेळाडू जखमी झाला, त्यानंतर पंतची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत ही मालिका पंतसाठी सोपी होणार नाही. आणि दक्षिण आफ्रिकेला टक्कर देऊ शकेल असा प्लेइंग इलेव्हन निवडण्याची डोकेदुखी त्याच्या समोर असेल.
भारतीय संघ: ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, उमरान मलिक.