भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका टीममधील पहिला वनडे सामना गुरुवारी धर्मशाला (Dharamshala) येथे होणार आहे. अखेरच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडकडून भारताला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते आणि हे पाहता विराट कोहलीची टीम इंडिया आफ्रिकाविरुद्ध मालिकेतून विजयी मार्गावर परत येऊ इच्छित असेल. दक्षिण आफ्रिकेने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-0 ने विजय मिळवला आणि परिणामी, आफ्रिकी टीम वाढीव मनोवृत्तीने भारताविरुद्ध मैदानात उतरेल. भारत आणि दक्षिण आफ्रिकातील शेवटची वनडे मालिका 2015 मध्ये भारतात खेळली गेली होती, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकाने 3-2 ने विजय मिळवला. मात्र, 2018 मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या 6 सामन्यांच्या मालिकेत 5-1 ने यजमान संघाला पराभूत केले होते. यामुळे या वेळी या दोन संघांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची अपेक्षा आहे. (IND vs SA 1st ODI Weather Forecast: पहिल्या वनडे सामन्यासाठी धर्मशालामध्ये असे असणार हवामान, पाऊस आणणार सामन्यात व्यत्यय? जाणून घ्या)

भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे संबंधित माहिती जाणून घ्या. भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिला सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. गुरुवारी दुपारी दीड पासून सामना सुरु होईल. टॉस भारतीय वेळेनुसार 1 वाजता होईल. पहिली वनडे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रसारित होईल. स्टार नेटवर्कच्या अन्य प्रादेशिक भाषेच्या चॅनेलवरही थेट प्रसारण केले जाईल. याचा लाईव्ह स्ट्रीमिंग हॉट स्टारवर उपलब्ध असेल.

सध्याच्या भारत दौर्‍यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे बदलला आहे. क्विंटन डी कॉक याच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगली कामगिरी करून इतिहासाची पुनरावृत्ती करू इच्छित आहे. यंदाच्या वनडे मालिकेत सलामी फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ आणि शिखर धवन भारतासाठी सलामीची जबाबदारी असेल. याशिवाय केएल राहुल विकेटकीपर म्हून भारतीय संघाचा एक भाग असेल आणि मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. शिवाय, कर्णधार विराट कोहलीही फॉर्ममध्ये परतण्याचे प्रयत्न करेल.