बीजे वॅटलिंग (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडचा (New Zealand) यष्टीरक्षक फलंदाज बी.जे. वॅटलिंग (BJ Watling) आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत आहे. भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल 2021 हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल. मात्र, यावेळी वॅटलिंगबरोबर अपघात झाला. भारतीय डाव दरम्यान एक थ्रो घेताना, त्याच्या उजव्या हाताची रिंग फिंगर (सर्वात लहान बोटाजवळील बोट) डिस्लोकेट झाले. मात्र, यानंतरही तो सामन्यात विकेटकिपिंग दिसला. दुपारच्या जेवणापूर्वी त्याला दुखापत झाली होती पण यानंतरही त्याने कीपरचे ग्लोव्ह्ज घातले होते आणि टीम इंडियाला (Team India) गोलंदाजांनी ऑलआऊट केले तोपर्यत तो मैदानात उपस्थित होता. यादरम्यान त्याने फिजिओकडून उपचारासाठी मदतही घेतली. (IND vs NZ WTC Final 2021: सहाव्या दिवशी मैदानावर उतरताच Virat Kohli ने दाखवली खेळाडूवृत्ती, BJ Watling सोबतच्या कृतीने जिंकली कोट्यावधी चाहत्यांची मने)

आपल्या करिअरच्या शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापती झाल्यानंतरही त्याने मैदानात कामगिरी सुरु ठेवल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. असं असलं तरी, वॅटलिंग सर्वतोपरीने संघासाठी कामगिरी करण्यासाठी प्रख्यात आहे. त्याने शेवटच्या कसोटीच्या अखेरच्या डावातही तीन झेल घेतले. यापैकी दोन कॅच त्याने तेव्हा पकडले जेव्हा त्याचे बोट डिस्लोकेट झाले होते. दरम्यान भारताविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यांनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे वॅटलिंगने यापूर्वीच जाहीर केले होते. त्याने न्यूझीलंडकडून आतापर्यंत 74 कसोटी सामने खेळले आहेत आणि 37.89 च्या सरासरीने 3789 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आठ शतके आणि 19 अर्धशतकांची नोंद आहेत. 205 ही कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच त्याने न्यूझीलंडसाठी 28 वनडे आणि पाच टी-20 सामने देखील खेळले आहेत.

त्याने 2009 मध्ये पाकिस्तान विरोधात टी-20 सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तथापि, मर्यादित षटकांच्या क्रिकेटपेक्षा तो कसोटींमध्ये अधिक यशस्वी झाला आहे. त्याने कसोटी सामन्यात 262 झेल आणि विकेटच्या मागे आठ स्टंपिंग्सही केल्या आहेत. दुसरीकडे, साउथॅम्प्टन येथे दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्याशी हातमिळवणी केली आणि त्याला शुभेच्छा दिल्या. आयसीसीने देखील याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि भारतीय कर्णधाराच्या खेळाडू वृत्तीचे कौतुक केले.