IND vs NZ WTC Final 2021: सहाव्या दिवशी मैदानावर उतरताच Virat Kohli ने दाखवली खेळाडूवृत्ती, BJ Watling सोबतच्या कृतीने जिंकली कोट्यावधी चाहत्यांची मने (Watch Video)
बी. जे. वॅटलिंग आणि विराट कोहली (Photo Credit: Twitter)

IND vs NZ WTC Final 2021 Day 6: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळला जात आहे. पावसाने व्यथतीत झालेला सैन्याने अनिर्णित होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. राखीव दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली असून दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने (Team India) विराट कोहली (Virat Kohli) , चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची महत्वपूर्ण विकेट गमावली. दरम्यान, राखीव दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी विराटने आपल्या खेळाडूवृत्तीने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या न्यूझीलंडच्या बी.जे. वॅटलिंगशी (BJ Watling) हातमिळवणी करून भारतीय कर्णधाराने कीवी यष्टीरक्षकाचे त्याच्या कारकीर्दीबद्दल अभिनंदन केले.

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराटचा हा अंदाज अनेक यूजर्सना पसंत पडत आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना आयसीसीने भारतीय कर्णधाराच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक केले. व्हिडिओमध्ये विराट वॅटलिंगबरोबर हात मिळवणी करत असून दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून वॅटलिंगने निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. केन विल्यमसनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाचा वॅटलिंग एक आधारस्तंभ होता. 35-वर्षीय फलंदाजाने किवी संघाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठण्यात अविभाज्य भूमिका बजावली आहे. वॅटलिंगने 73 कसोटी सामन्यात 3773 धावा केल्या. यामध्ये 8 शतकांचाही समावेश आहे. त्याने 28 एकदिवसीय सामने आणि 5 टी-20 सामने खेळले ज्यात त्याने अनुक्रमे 573 आणि 38 धावा केल्या आहेत. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सचा स्टार खेळाडू एक स्टार यष्टिरक्षक देखील आहे. त्याने 263 झेल (आउटफिल्डर म्हणून 10) घेतले आणि त्याच्या सुशोभित कसोटी कारकीर्दीत 8 स्टॅम्पिंग केले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा वॅटलिंग हा केवळ 9 वा विकेटकीपर ठरला असून इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याने 2019 मध्ये बे ओव्हल येथे हा कारनामा केला होता.  दरम्यान, साउथॅम्प्टन येथे सुरु असलेलया सामन्याबद्दल बोलायचे तर डब्ल्यूटीसी फायनलच्या दोन्ही डावांत विराट काईल जेमीसनचा शिकार बनला. दुसर्‍या डावात 29 चेंडूंचा सामना करून कोहली केवळ 13 धावाच करू शकला. तसेच कसोटी तज्ज्ञ फलंदाज पुजारानेही अवघ्या 15 धावांचा डाव खेळला.