IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंड संघावर संकट, टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजावर सामन्याबाहेर पडण्याची शक्यता
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: BlackCaps/Twitter)

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला (Indian Team) त्यांच्या पहिल्याच टी-20 विश्वचषक सामन्यात पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 10 गडी राखून पराभवाचे तोंड पाहायला लागले. पण या सामन्यातील पराभव मागे टाकून आता टीम इंडिया (Team India) पुढील सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. आता स्पर्धेत टिकण्यासाठी भारताला न्यूझीलंडला (New Zealand) कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचा पुढील सामना रविवार, 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे कारण संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलच्या (Martin Guptill) पायाच्या दुखापतीमुळे त्याचे खेळणे जवळपास अनिश्चित झाले आहे. हे पाहता भारतासोबत होणाऱ्या मोठ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागू शकतो आणि आता टीम इंडियाच्या विजयातील एक अडथळा दूर झाला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. (T20 World Cup 2021: हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर टीम मॅनेजमेंटने दिला मोठा अपडेट, पहा काय म्हणाले)

शारजाहच्या मैदानावर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात गप्टिलने 17 चेंडूत 20 धावा केल्या. या सामन्याच्या पॉवरप्लेदरम्यान हरिस रौफचा एक चेंडू गप्टिलच्या पायाला लागला ज्यामुळे तो जखमी झाला. या सामन्यात न्यूझीलंड संघ पाकिस्तानकडून पाच विकेटने पराभूत झाला होता. सामन्यानंतर न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टड म्हणाले, “खेळाच्या शेवटी दुखापत झालेला गप्टिल थोडा अस्वस्थ दिसत होता आणि आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत.” येत्या 24 ते 48 तासात दुखापतीबाबत सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला आधीच स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. अशा स्थितीत जर गप्टिलही भारताविरुद्ध सामन्यातून बाहेर पडला तर किवी संघासाठी हा दुसरा मोठा धक्का ठरू शकतो. दुखापतग्रस्त फेर्ग्युसनच्या जागी अॅडम मिल्नेचा समावेश करावा अशी मागणी न्यूझीलंड संघाने आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने ती मान्य केली नाही. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले होते की ते एकदा या मुद्द्यावर नंतर नक्कीच आयसीसीशी चर्चा करतील.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामागचे कारण म्हणजे भारताने हा सामना गमावला तरी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते जवळपास बाहेर पडू शकतात. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा भारतावर पहिला विजय आहे. यापूर्वी नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने पाकिस्तानला 152 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 152 धावांचे आव्हान 17.5 षटकांत एकही विकेट न गमावता गाठले.