IND vs NZ, T20 World Cup 2021 Live Streaming: भारत-न्यूझीलंड टी-20 विश्वचषक सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कसे पाहणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Instagram)

T20 World Cup 2021: दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ आमनेसामने मैदानात उतरतील. पहिला सामना गमावल्यानंतर दोन्ही संघांसाठी हा करा किंवा मरो असा सामना आहे. सुपर 12 टप्प्यातील गट-2 मधील या सामन्यात पराभूत झालेल्या संघासाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खूपच कठीण होईल. टीम इंडिया (Team India) फटाफट क्रिकेटच्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध पहिला विजय नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल, तर केन विल्यमसन आणि कंपनी 31 ऑक्टोबरच्या रात्रीही भारतीय संघावर (Indian Team) वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम ठेवू इच्छित असेल. अशा स्थितीत आजच्या सामन्यातील नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 28 व्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टीव्हीवर थेट प्रक्षेपणाचा सर्व तपशील खालीलप्रमाणे आहे. (IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या ‘या’ फिरकी जोडीपासून सावधान विराट कोहली, 2016 मध्ये खेळ खराब केला आहे)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याच्या अर्धातास पूर्वी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. तसेच भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1/1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तामिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय Disney + Hotstar अ‍ॅपवर तुम्ही भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

दरम्यान विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचे संघ आतापर्यंत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये दोनदा आमनेसामने आले असून प्रत्येक वेळा किवी संघाने बाजी मारली आहे. 2007 च्या टी-20 विश्वचषकात ही लढत रोमांचक होती, पण 2016 मध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाचा 47 धावांनी सहज पराभव केला होता. अशा परिस्थितीत कोहलीला कर्णधार म्हणून टी-20 चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रविवारी रात्री इतिहास बदलावा लागेल. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. विराट कोहली टीम इंडियाला पाकिस्तानने 10 गडी राखून पराभूत केले होते तर केन विल्यमसनच्या संघालाही पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता.