केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या सुपर 12 टप्प्यातील महत्त्वाच्या सामन्यात आज टीम इंडियाचा (Team India) सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. दुबई आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होणार आहे. पराभूत संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अत्यंत खडतर होईल तर विजयी संघ सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकेल. दोन्ही संघाच्या आकडेवारीचा विचार केला तर किवी संघाचा वरचष्मा दिसत आहेत. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदीच्या नेतृत्वात न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतील, पण कोहली आणि कंपनीला सर्वात मोठा धोका न्यूझीलंडच्या फिरकी जोडीकडून आहे. ईश सोधी (Ish Sodhi) आणि मिचेल सँटनर (Mitchell Santner) यांनी मिळून 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा खेळ खराब केला होता. नागपुरात झालेल्या त्या सामन्यात सोधी आणि सँटनर यांनी मिळून सात भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं होतं. (T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध जिंकल्यास सेमीफायनल प्रवास सुकर होईल, पण परभूत झाल्यास अशी पार होणार भारताची नौका?)

सोढी आणि सॅंटनरने मिळून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा यांसारख्या मोठ्या विकेट्स काढल्या होत्या. या दोघांच्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडिया फलंदाज अशाप्रकारे अडकले की अवघ्या 79 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. अशा परिस्थितीत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यातही ‘विराट ब्रिगेड’ला सोढी-सँटनेरच्या जोडीपासून सावध राहावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात सोढीने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 28 धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघ आतापर्यंत दोन वेळा आमनेसामने आले असून दोन्ही वेळा किवी संघाने विजय मिळवला आहे. 2007 मध्ये दोन्ही संघात झालेली पहिली लढत रोमांचक होती. मात्र 2016 मध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाचा एकतर्फी पराभव झाला. जर भारत आज न्यूझीलंडचा पराभव करण्यात यशस्वी ठरला तर तो किवी संघाचा विजयी मालिका खंडित करेल. यासह टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग सुकर होणार होईल. उल्लेखनीय आहे की आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा अखेर पराभव केला होता आणि त्यानंतर 18 वर्षात टीमला फक्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात केन विल्यमसनच्या किवी संघाने ‘विराटसेने’चे स्वप्न दोनदा भंग केले होते. अशा स्थितीत भारतीय संघाला यंदा या जुन्या पराभवांचा हिशेब चुकता करायची संधी आहे.