IND vs NZ ICC WTC Final: टीम इंडिया फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी किवी फलंदाजाने लढवली अनोखी ‘शक्कल’, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी करतोय कंबर कसून सराव
डेव्हन कॉनवे (Photo Credit: Instagram)

IND vs NZ ICC WTC Final: न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेने (Devon Convey) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यात भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाण्यासाठी अनोखी ‘शक्कल’ लढवली आहे. कॉनवे विकेटवर कचरा पसरवून सराव करीत आहे. याद्वारे तो भारतीय फिरकीपटूंचा टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात सहज सामना करू शकेल याबाबत तो आशावादी आहे. भारतीय संघात (Indian Team) रवी अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारखे दर्जेदार फिरकी पर्याय उपलब्ध आहेत. किवी संघाकडून 3 वनडे आणि 14 टी-20 सामने खेळलेल्या कॉनवेला अद्याप कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघाला त्याचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ (Indian Team) पहिल्या क्रमांकावर आहे तर न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर आहे. (ICC WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे 5 सर्वात यशस्वी कर्णधार, भारतीय नव्हे ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी!)

या दौर्‍यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या 29 वर्षीय वर्षीय कॉनवेला वाटते की खेळपट्टीवर कचरा पसरवून तो वेगाने फिरणारे चेंडू चांगले खेळू शकेल. “मुळात कल्पना असा आहे की बॉल उरकण्यापासून काही वेगळा मार्ग काढावा,” कॉनवेने न्यूझीलंडच्या ब्रॉडकास्टर स्पार्क स्पोर्टला सांगितले. "हे खेळणे थोडे कठीण आहे, परंतु चांगला सराव आहे...फिरकी गोलंदाजी खेळणे सोपे नाही. परंतु आपण गेम प्लॅनप्रमाणे यापूर्वी तयारी केल्यास आपण सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकता.” इंग्लंड दौऱ्यावर भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी किवी संघ 2 जूनपासून यजमान संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

किवी संघासाठी कॉनवेच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर कॉनवेने न्यूझीलंडकडून आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि 14 टी -20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने एक शतक आणि 1 अर्धशतकासह 225 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 मध्ये या फलंदाजाने 151 च्या स्ट्राईक रेटने 473 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने चार अर्धशतके ठोकली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या 99 नाबाद आहे. याशिवाय, न्यूझीलंड बोर्डाने कॉनवेचा खेळ पाहून त्याला 2021-22 वर्षासाठीच्या 20 खेळाडूंच्या केंद्रीय कराराच्या यादीत स्थान दिले आहे.