भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 कर्णधार म्हणून चांगली सुरुवात केली असून, संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) तीन सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. जयपूर आणि रांचीमध्ये विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माची ‘हिटमॅन’ आर्मी आता कोलकात्यात (Kolkata) पोहोचली आहे आणि ‘क्लीन स्वीप’ करण्यासाठी ईडन गार्डन्सपेक्षा (Eden Gardens) चांगली जागा असू शकत नाही. कारण रोहितला हे मैदान खूप आवडते आणि त्याने या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी (264 धावा) केली आहे. आजच्या सामन्यातही त्याला दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्ध हा मालिका विजय हा भारताचा तिसरा तर यंदा वर्षाच्या सुरुवातीला डाऊन-अंडर 5-0 ने स्वीप केल्यानंतर सलग दुसरा विजय आहे. तसेच सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताचा कायमस्वरूपी कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माचा हा पहिला मालिका विजय आहे. (IND vs NZ 2nd T20 2021: सुरक्षारक्षकांना चकमा देत रोहित शर्माचा चाहता मैदानात घुसला, ‘हिटमॅन’च्या पाया पडला, पहा व्हिडिओ)
रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 147 षटकार मारले आहेत आणि अशा परिस्थितीत आज जर त्याच्या बॅटमधून तीन षटकार निघाले तर 150 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. रांचीमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात रोहितने 36 चेंडूत पाच षटकारांसह एकूण 55 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यामुळे जर रोहितने आज आणखी तीन षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 150 षटकार मारणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू बनू शकतो. त्याच्याशिवाय आतापर्यंत फक्त किवी सलामीव्वेर मार्टिन गप्टिल यालाच ही कामगिरी करता आली आहे. याशिवाय दुसऱ्या विक्रमाबद्दल बोलायचे तर आज रोहितकडे कर्णधार म्हणून न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. त्याने किवी संघाविरुद्ध आतापर्यंत 6 सामन्यात 252 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा इयन मॉर्गनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 36 धावांची गरज आहे. मॉर्गनने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 10 टी-20 सामन्यांमध्ये 287 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने 8 सामन्यात कर्णधार असताना 218 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात रोहित आपल्या आवडत्या क्रिकेट ग्राउंडवर वर उल्लेख केलेल्या मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. आणि आज हे रेकॉर्ड साध्य केल्या तो आणखी काही रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव दाखल करू शकतो.