IND vs NZ 2nd Test: रिद्धिमान साहाच्या फिटनेसवर Virat Kohli ने दिला मोठा अपडेट, संघ संयोजनावर केले मोठे भाष्य
रिद्धिमान साहा (Photo Credit: PTI)

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी पुष्टी केली की रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) त्याच्या मानेच्या ताणामधून बरा झाला आहे आणि शुक्रवारपासून मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध असेल. “आतापर्यंत, तो (साहा) तंदुरुस्त आहे. तो त्याच्या मानेच्या दुखण्यातून बरा झाला आहे आणि तो पूर्णपणे बरा आहे,” कोहली दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाला. सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी मानेतील ताठरपणामुळे भारताचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा मैदानात उतरू शकला नव्हता. अशा परिस्थितीत शुक्रवारी पदार्पण करू शकणाऱ्या श्रीकर भरतने (KS Bharat) त्याच्या अनुपस्थितीत विकेट्सच्या मागे जबाबदारी सांभाळली होती. साहाने चौथ्या दिवशी नाबाद 61 धावा करत यजमानांना 51 धावांवर पाच बाद, अशा अवघड परिस्थितीतून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. (IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात मोठे बदल, विराट कोहली ‘या’ फलंदाजाचा पत्ता कापणार; पहा संभाव्य Playing XI)

मानेच्या दुखण्यातून तो बरा झाल्याचे त्याने सांगितले. तसेच टीम कॉम्बिनेशनसाठी विराट म्हणाला की, “आम्हाला हवामान लक्षात घेऊन चर्चा करावी लागेल आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. आम्हाला सर्व परिस्थितीशी जुळवून घेणारे गोलंदाज निवडायचे आहेत कारण येत्या पाच दिवसात हवामान बदलू शकते.” साहाचा फिटनेस आणि विराट कोहलीची सामन्यासाठी उपलब्धतेमुळे मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यात फलंदाजी जागेसाठी स्पर्धा पाहायला मिळू शकते. भारत विरुद्ध न्यूझीलंड कानपूर कसोटीत पदार्पण करून श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून त्याने आधीच आपली जागा बळकट केली आहे. दरम्यान, साहा मुंबई कसोटी सामना खेळल्यास केएस भरतला भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणे अवघड आहे.

दुसरीकडे, भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल तो मालिका काबीज करेल. या मैदानावर दोन्ही संघ कसोटी सामना खेळण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे.न्यूझीलंडने भारतात फक्त दोन कसोटी सामने जिंकले आहेत आणि त्यापैकी एक विजय वानखेडेवर मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईत होणाऱ्या सामन्यात अखेरीस कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.