IND vs NZ 2nd Test: मुंबई कसोटीत Ashwin ने विजयी विकेट घेत मुरलीधरन, अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या विशेष यादीत घेतली एन्ट्री
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध मुंबई कसोटी (Mumbai Test) आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबई कसोटीत विजयी विकेट घेताच अश्विनने मुथय्या मुरलीधरन, जेम्स अँडरसन आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या विशेष यादीत सामील झाला आहे. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स (Henry Nicholls) हा घरच्या मैदानावर 300 वा कसोटी बळी ठरला, हा पराक्रम त्याच्या आधी जगातील फक्त तीन गोलंदाजांना करता आला आहे. मायदेशात 300 बळी घेणारा अश्विन हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या चेंडूवर हेन्री निकोल्सच्या रूपाने न्यूझीलंडने शेवटची विकेट गमावली आणि यासह टीम इंडियाने हा सामना 372 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी खिशात घातली आहे. दोन्ही संघांमध्ये कानपूरमध्ये खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. (IND vs NZ 2nd Test: रोमहर्षक सामन्यात विराट आर्मीने केला न्यूझीलंडचा सफाया, किवी संघाला 372 धावांनी लोळवून 1-0 ने मालिका केली काबीज)

अश्विन भारतात आपला 49 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मुंबईच्या मैदानात उतरला होता. अश्विनने दोन्ही डावात प्रत्येकी चार विकेट घेतल्या. या सामन्यापूर्वी घरच्या मैदानावर त्याने एकूण 292 विकेट्स घेतल्या होत्या. घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने श्रीलंकेत एकूण 493 कसोटी विकेट घेतल्या आहेत. तसेच इंग्लंडमध्ये जेम्स अँडरसनने 402 विकेट घेतल्या आहेत. या दोघांशिवाय घरच्या मैदानावर 400 पेक्षा जास्त विकेट घेणारा जगात दुसरा कोणताही गोलंदाज नाही. अनिल कुंबळे 350 विकेट घेतून तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने 63 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये 300 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो सध्या एकमेव भारतीय गोलंदाज होता. दरम्यान अश्विन सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो अनिल कुंबळेला मागे टाकू शकतो, असे दिसत आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा 372 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून इतिहास रचला. धावांच्या बाबतीत हा त्याचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. 540 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव 167 धावांवर आटोपला. तसेच घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 14 वा कसोटी मालिका विजय आहे.