IND vs NZ 2nd Test: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोमहर्षक सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडला (New Zealand) मालिकेच्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात 372 धावांनी लोळवून दोन सामन्यांची मालिका 1-0 ने मालिका जिंकली आहे. कानपुर येथे झालेल्या मालिकेचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर कर्णधार विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) जोरदार पुनरागमन करून किवी संघावर एकतर्फी विजय मिळवला. उल्लेखनीय आहे की खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 14 वा मालिका विजय आहे. भारताच्या विजयात पुन्हा एकदा संघाचे फिरकी गोलंदाज चमकले. आर अश्विन (R Ashwin) आणि जयंत यादवने (Jayant Yadav) प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने 1 गडी बाद केला. (IND vs NZ 2nd Test: एजाज पटेलने 14 विकेट घेत मोडला Ian Botham चा विक्रम, टीम इंडियाविरुद्ध पहिल्यांदाच असे घडले)
दुसरीकडे, न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने (Daryl Mitchell) सर्वाधिक 60 धावा केल्या तर हेन्री निकोल्सने 44 धावांचे योगदान दिले. तथापि संघ अडचणीत असताना अन्य खेळाडूंची साथ न मिळाल्याने दोघे संघाचा डाव सावरण्याचा अपयशी ठरले. कानपुर येथे पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यावर मुंबई सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंक अग्रवालचे शतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 325 धावा केल्या. इतकंच नाही तर न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने भारताच्या सर्व फलंदाजांना बाद करत 10 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र, किवी संघ पहिल्या डावात 62 धावांत आटोपल्याने त्यांच्या पदरी पराभवाची निराशा आली. भारताकडून पहिल्या डावात अश्विनने 4 विकेट, मोहम्मद सिराजने 3 विकेट, अक्षर पटेलने 2 आणि जयंत यादवने 1 गडी बाद केला. यानंतर पहिल्या डावात 263 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने मयंक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलच्या 47 धावा, अक्षर पटेलच्या 41 धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या 36 धावांच्या जोरावर आगेकूच केली.
तिसऱ्या दिवशी 7 बाद 276 धावांवर दुसरा डाव घोषित केला. या डावात न्यूझीलंडकडून एजाज पटेलने 4, तर रचिन रवींद्रने 3 विकेट घेतल्या. अशाप्रकारे एजाजने सामन्यात 14 विकेट्स आपल्या नावावर केल्या. भारताने एकूण 540 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडपुढे ठेवले होते. तथापि पुन्हा एकदा फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभवाचे तोंड पाहायला लागले. तडाखेबाज फलंदाज डॅरिल मिशेलने संघासाठी एकतर्फी लढा दिला आणि अर्धशतक झळकावले. मिशेलने 92 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि दोन षटकार खेचले.