IND vs NZ 1st Test: राहुलच्या एक्झिटमुळे टीम इंडियाची अडचण, पहिल्या कसोटीसाठी अशी असेल प्लेइंग 11; कोहलीच्या जागी उतरणार ‘हा’ खेळाडू!
अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. कानपूर (Kanpur) येथील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) लढाईच्या तयारीत असलेल्या भारतीय संघासमोर (Indian Team) मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राहुलच्या दुखापतीनंतर प्लेइंग 11 च्या निवडीबाबत टीम इंडियासमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. रोहित शर्माला मालिकेपूर्वीच विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाची (Team India) सलामीची जोडी बनवणे ही सर्वात मोठी समस्या असेल. तसेच पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी अजिंक्य रहाणे नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे कोहलीऐवजी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोणाला कसोटी पदार्पणाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत भारत कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह खेळू शकतो याकडे एक नजर टाकूया. (IND vs NZ Test Series 2021: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘या’ भारतीय गोलंदाजाने घेतल्या 13 विकेट्स, रहाणेच्या टीम इंडियाचा ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’)

राहुल उपलब्ध असताना भारताच्या ओपनिंग कॉम्बिनेशनवर प्रश्न निर्माण झाले होते पण आता मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल कानपूर कसोटीत भारतासाठी सलामीला उतरतील तर चेतेश्वर पुजारा नेहमीच्या तिसऱ्या क्रमांक फलंदाजी करेल. पहिल्या कसोटीला मुकलेल्या विराट कोहलीने सोडलेली पोकळी भरून काढत अय्यर चौथ्या स्थानावरून कसोटी पदार्पण करू शकतो. त्याच्या पाठोपाठ स्थायी कर्णधार अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर असेल. रहाणेवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल. पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या अनुपस्थितीत रिद्धिमान साहा स्टंपच्या मागे स्थान घेईल. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या त्याच्यापुढे फलंदाजी करणे अपेक्षित आहे. सहाव्या क्रमांकावर जडेजानंतर साहा सातव्या क्रमांकावर उतरेल. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल हे टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज म्हणून खेळू शकतात.

गोलंदाजीत मोहम्मद सिराजला संधी निश्चित आहे, परंतु दुसऱ्या सीमरसाठी इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यात स्पर्धा होऊ शकते. इशांत सर्वात महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, तर उमेशच्या इंग्लंडविरुद्ध कामगिरीने अनेकांना प्रभावित केले होते. त्यामुळे कानपूर कसोटीसाठी उमेश आणि इशांत यांच्यातील एकाची निवड करणे संघ व्यवस्थापनाला डोकेदुखी ठरणार आहे.

भारत संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा/उमेश यादव.