IND vs ENG T20I Series: इंग्लंडविरुद्ध (England) टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला चांगली बातमी मिळाली आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) भारतीय संघ (Indian Team) दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे तर इयन मॉर्गनच्या इंग्लिश टीमने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यापूर्वी टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर होती आणि त्यांनी एक स्थानाची झेप घेत दुसरे स्थान मिळवले असून इंग्लंडच्या आता फक्त सात गुणांनी पिछाडीवर आहे. टीम इंडिया यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर होती परंतु न्यूझीलंडकडून ऑस्ट्रेलियाच्या 3-2 अशा पराभवानंतर भारतीय संघाची क्रमवारीत प्रगती झाली आहे. तथापि, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केवळ एका अंकाचा फरक आहे. मात्र, इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत भारतीय संघाकडे टी-20 रँकिंगमध्ये पहिले स्थान गाठण्याची सुवर्ण संधी आहे. तथापि, टीम इंडियासाठी मालिका जिंकणे पुरेसे ठरणार नाही. (IND vs ENG Series: बुमराहच्या ‘या’ रेकॉर्डपासून युजवेंद्र चहल फक्त एक पाऊल दूर, सूर्यकुमार यादव इतिहासाच्या उंबरठ्यावर, इंग्लंड T20 मालिकेत बनू शकतात हे प्रमुख रेकॉर्ड)
टीम इंडियाला रँकिंगमध्ये पहिले स्थान गाठायचे असल्यास यजमान संघाला किमान 4-1 अशा फरकाने इंग्लिश टीमचा पराभव करणे गरजेचे असेल. टीम इंडियाने 3-2ने विजय मिळविल्यास इंग्लंड पहिल्या, भारत दुसर्या आणि ऑस्ट्रेलियाचे तिसरे स्थान कायम राहील. दरम्यान, आयसीसीने काही दिवसांपूर्वी टी-20 रँकिंग जाहीर केली ज्यामध्ये भारताचा युवा सलामी फलंदाज केएल राहुलची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. राहुलचे 816 रेटिंग गुण आहेत तर आयसीसीच्या क्रमवारीनुसार विराट कोहलीचे सहावे स्थान कायम आहे. फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा डेविड मलान पहिल्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने विजय मिळवत ‘विराटसेने’ने कसोटी क्रमवारीत देखील मानाचे स्थान पटकावले आहे.
दुसरीकडे, अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघातील सर्व पाच टी-20 सामने खेळले जाणार आहे. सामन्याच्या काही तासांपूर्वी आभासी पत्रकार परिषदेत यजमान टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने जाहीर केले की पहिल्या सामन्यात रोहित शर्मासह राहुल सलामीला उतरेल तर शिखर धवन संघाचा तिसरा ओपनर असेल.