सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत चमकदार पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात सूर्यकुमारने 31 चेंडूंत शानदार 57 धावा फटकावल्या. या वेगवान डावात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले, पण दुर्दैवाने त्याच्या डावात अंत विवादास्पद पद्धतीने झाला. सॅम कुरनच्या चेंडूवर सूर्याने मोठा शॉट खेळला पण चेंडू बाउंड्री लाईनच्या पार नऊ शकला नाही आणि डेविड मलानने (Dawid Malan) त्याचा रोमांचक झेल पकडला. सूर्यकुमारच्या या खेळीच्या जोरावर चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी पराभव करण्यात भारताला यश आले. या खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कारही मिळाला. विशेष म्हणजे, आपल्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. सूर्याच्या या धमाकेदार खेळीनंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) एक ट्विट व्हायरल होत आहे. (IND vs ENG 4th T20I 2021: Suryakumar Yadav आऊट की नॉट आऊट? फलंदाजाच्या वादग्रस्त विकेटवर विराटसह Netizensने दिली अशी रिअक्शन)
रोहितने 2011 मध्ये एक भविष्यवाणी केली होती. रोहितने 10 डिसेंबर 2011 रोजी एक ट्विट केले. चेन्नईत बीसीसीआय (BCCI) पुरस्कारानंतर त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “चेन्नईत बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा पार पडला. येणाऱ्या काळात काही अद्वितीय खेळाडू समोर येतील. मुंबईकर सूर्यकुमारवरच्या भविष्यावर येत्या काळात नजर असेल.” टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या डेब्यू डावात अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार हा पाचवा भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे आणि ईशान किशन यांनी हा कारनामा केला आहे. उथप्पाने 2007 टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध डर्बन येथे 50 धावा केल्या होत्या. त्याच वर्ल्ड कपमध्ये रोहितनेही दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात नाबाद 50 धावांचे योगदान दिले होते. यानंतर, 2011 मध्ये अजिंक्य रहाणेने डेब्यू टी-20 सामन्यात सर्वाधिक 61 धावांची खेळी केली होती.
Just got done with BCCI awards here in chennai..some exciting cricketers coming up..Suryakumar yadav from Mumbai to watch out for in future!
— Rohit Sharma (@ImRo45) December 10, 2011
दरम्यान, सूर्यकुमार यादव घरगुती क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) सातत्याने कामगिरी करत आहे. यादवने आयपीएलच्या मागील मोसमातील 15 सामन्यांत 480 धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने 101 आयपीएल सामन्यांमध्ये 30.20 च्या सरासरीने 2024 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 11 अर्धशतके ठोकली आहेत. मुंबई संघापुर्वी सूर्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला आहे.