
IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड मंगळवार, 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या फिटनेसकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळाडूंच्या दुखापतींने टीम इंडिया (Team India) बेजार झाली आहे. जवळजवळ सर्व मुख्य गोलंदाज आणि फलंदाजांना डाऊन अंडर दौऱ्यावर कसोटी मालिकेदरम्यान दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. आयपीएल 2020 दरम्यान दुखापत झाल्यानंतर इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आधीच अनुपलब्ध नव्हता तर मोहम्मद शमी, उमेश यादव, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, केएल राहुल यांनाही संबंधित दुखापतीनंतर मालिका सुरु असतानाच भारतात परतावे लागले. अश्विन, जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे ब्रिस्बेनच्या चौथ्या टेस्ट मॅचला मुकावे लागले. तथापि, ते म्हणतात ना एकाचे नुकसान दुसऱ्यासाठी फायद्याचे ठरू शकते. असेच काहीसे आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेदरम्यान पाहायला मिळू शकते. इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई (Chennai) येथे 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे अनेक खेळाडूंना मोठ्या फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. (IND vs ENG T20I 2021: इंग्लंडविरूद्ध टी-20 मालिकेसाठी 'हे' 5 खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचे आहेत दावेदार)
1. युजवेंद्र चहल
चहलने मागील काही वर्षात स्वतःला विराटसेनेच्या वनडे आणि टी-20 संघाच्या भरवश्याचा गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत चहलने 54 वनडे आणि 45 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 92 आणि 59 विकेट्स घेतल्या आहेत. चहलने हरियाणाकडून 31 प्रथम-श्रेणी सामन्यात 3.06च्या इकॉनॉमीने 84 गडी बाद केले आहेत. मर्यादित ओव्हरमध्ये प्रभावी कामगिरी करूनही 30 वर्षीय फिरकीपटू टेस्ट डेब्यूच्या प्रतीक्षेत आहे आणि मुख्य खेळाडूंच्या दुखापतीनंतर त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते.
2. हार्दिक पांड्या
गेल्या काही वर्षांपासून हार्दिक मर्यादित ओव्हरमध्ये भारतासाठी परिपूर्ण फिनिशर आणि पाचवा गोलंदाज म्हणून उदयास आला आहे आणि खेळाच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये तीच भूमिका चांगल्याप्रकारे निभावण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. हार्दिकने 2017मध्ये कसोटी पदार्पण केले, पण खराब फॉर्ममुळे त्याला नंतर संघातून बाहेर केले गेले. 11 कसोटी सामन्यांमध्ये पांड्याने 31.3 च्या सरासरीने केवळ 532 धावा केल्या असून 3.38 च्या इकॉनॉमी रेटने 17 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड कसोटी मालिकेसाठी हार्दिककडे व्यवस्थापनाचे लक्ष असू शकते परंतु पाठीच्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करत नसल्याने कदाचित त्याचा एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून समावेश केला जाऊ शकतो.
3. वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जबरदस्त कामगिरी केलेला सुंदरने संघातील आपले स्थान कायम ठेवण्याची मोठी शक्यता आहे. जडेजाची जागा घेण्यासाठी तो मुख्य दावेदार असेल. सुंदरने 25 टी-20 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. डाऊन अंडर ब्रिस्बेन टेस्टमध्ये डेब्यू करत सुंदरने पहिल्या डावात 3 विकेट आणि फलंदाजीने जबरदस्त कामगिरी करत 62 धावा केल्या व संघाचा डाव सावरण्याचा मधल्या फळीत निर्णायक भूमिका बजावली. अशा स्थितीत त्याला आणखी एक संधी मिळू शकते.
4. भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यास पूर्ण फिट असल्याने भारतीय व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला असेल. दुखापतींमुळे भुवि 2018 नंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. भुवनेश्वरने फक्त 21 सामन्यात 26.1 च्या सरासरीने आणि 26.1 च्या इकॉनॉमी रेटने 63 विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी अनुपलब्ध असल्यास तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या घरगुती कसोटी मालिकेत भुवी भारतीय इलेव्हनचा महत्त्वपूर्ण भाग बनण्याची दाट शक्यता आहे.
5. शाहबाज नदीम
प्रथम श्रेणी सामन्यात नदीमने 117 सामन्यांत 2.70 च्या सरासरीने व 28.7 च्या सरासरीने 443 विकेट्स घेतल्या आहेत. या आश्चर्यकारक कामगिरीच्या जोरावर त्याला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑक्टोबर 2019 मध्ये कसोटी पदार्पणची संधी मिळाली जिथे त्याने 2.30 च्या इकॉनॉमी दोन डावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या. मात्र, त्यानांतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही आणि याचे मुख्य कारण रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांचा फॉर्म आहे. तथापि, फिरकी अष्टपैलू जडेजा इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या काही सामन्यात उपलब्ध नसण्याची शक्यता असल्याने नदीमला पांढर्या जर्सीमध्ये चमकण्याची आणखी एक संधी मिळू शकते.