विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

IND vs ENG 5th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना शुक्रवारपासून मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळला जाईल. टीम इंडियाने (Team India) ओव्हलवर खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 157 धावांनी पराभूत केले आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी मोठी आघाडी घेतली. आता मँचेस्टरमधील पाचवा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि जिंकला तर कसोटी मालिका भारताच्या नावे होईल. अशा स्थितीत असे झाल्यास भारत इंग्लंडमध्ये 14 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकेल. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वात 2007 मध्ये भारताने इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. आता राहुल द्रविडशी बरोबरी करण्याची संधी कोहलीला मिळणार आहे. विशेष म्हणजे सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि महेंद्र सिंह धोनीसारखे (MS Dhoni) महान कर्णधार देखील इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात अपयशी ठरले होते. (IND vs ENG: ‘इंग्लंड-इंग्लिश मीडिया आतापासून अ‍ॅशेसमध्ये मग्न झाला आहे आणि भारत...’ या दिग्गज खेळाडूने ब्रिटिशांना मारले टोमणे)

आता दोन्ही संघांमधील मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे शुक्रवार, 10 सप्टेंबरपासून खेळला जाईल. टीम इंडिया 1936 पासून ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळत आहे. भारतीय संघाने येथे (1936-2014) आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान टीम इंडियाला चार सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. तर 5 कसोटी अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच 85 वर्षे झाली, पण भारताला अद्याप या भूमीवर ब्रिटिशांविरुद्ध विजय मिळालेला नाही. दुसरीकडे, यजमान इंग्लंडने आतापर्यंत मँचेस्टरमध्ये 81 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 31 सामने जिंकले आहेत आणि 15 हरले आहेत. तसेच 35 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. 2014 च्या दौऱ्यात भारतीय संघाने आपला शेवटचा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला. यावेळी त्यांना इंग्लंडकडून एक डाव आणि 54 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया विजय मिळवून मालिका जिंकण्याचा बहुप्रतीक्षित कारनामा करण्यासाठी उत्सुक असेल.

पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी मोठे योगदान दिले आहे तर इंग्लंड संघ अद्यापही कर्णधार जो रूटवर पूर्णपणे अवलंबून राहिला आहे. रूटने आतापर्यंत मालिकेत तीन शतके ठोकली आहे. आणि पाचव्या सामन्यात जर त्याची बॅट पुन्हा तळपली तर तो भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतो.