IND vs ENG 5th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत अखेर यजमान टीम इंडियाने (Team India) 36 धावांनी बाजी मारली. मालिकेच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारताने रोहित शर्मा-विराट कोहली (Virat Kohli) यांची अर्धशतकी खेळी आणि सूर्यकुमार यादव-हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर 224 धावांचा डोंगर उभारला. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड (England) संघ निर्धारित ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 धावांवर ढेर झाला. अशाप्रकारे यजमान संघाने 3-2 ने मालिका काबीज केली. इंग्लंडकडून डेविड मलानने (Dawid Malan) सर्वाधिक 68 धावा केल्या तर जोस बटलर (Jos Buttler) 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. बेन स्टोक्सने 14 आणि क्रिस जॉर्डनने 11 धावा केल्या. दुसरीकडे, यजमान भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाजांनी संघाच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. शार्दूल ठाकूरला 3, भुवनेश्वर कुमारला 2 विकेट मिळाल्या तर हार्दिक आणि टी नटराजनने प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs ENG 5th T20I 2021: रोहित शर्मा-विराट कोहलीच्या जोडीवर Michael Vaughan यांनी केला कौतुकाचा वर्षाव, भारताच्या ‘या’ महान जोडीशी केली तुलना)
मोटेराच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर 225 च्या विशाल धावसंख्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारने संघाला पहिला धक्का देत जेसन रॉयला पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर बोल्ड करत माघारी धाडलं. यानंतर बटलर आणि मलानने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. यादरम्यान, मलानने अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि टीम इंडियाला ही भागीदारी मोडण्यासाठी संघर्ष करावा लागला. मलान पाठोपाठ बटलरने देखील अर्धशतकी धावसंख्या गाठली. मात्र, अर्धशतक करताच बटलरला भुवनेश्वरने आऊट केलं. शार्दुलने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आणि जॉनी बेयरस्टोला सूर्यकुमारच्या हाती आऊट 7 धावांवर झेलबाद केलं. शार्दूलने निर्णायक क्षणी इंग्लंडला 15व्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले आणि बेयरस्टोनंतर मलानला आऊट केलं. हार्दिकने इयन मॉर्गनला स्वस्तात माघारी धाडलं.
दुसरीकडे, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर आता दोन्ही संघात 23 मार्चपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. पुणेच्या गहुंजे स्टेडियमवर सर्व तीन सामने आयोजित केले जाणार आहेत.