भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या भक्कम फॉर्ममध्ये नसला तरी तो अजूनही धावा करत आहे. नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 पर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्ब्ल एक हजार धावा केल्या आहेत. मात्र, या काळात त्याने एकही शतक झळकावले नाही आणि हीच गोष्ट त्याला त्रास देत आहे. इतकंच नाही तर इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये (The Oval) त्याला विश्वविक्रम करण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात त्याला विशेष यश मिळण्याची मोठी संधी आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22,999 धावा केल्या आहेत आणि जर त्याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात एक धावा केली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजार धावांचा टप्पा सर करेल. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. (India's 4th Test Likely Playing XI: अजिंक्य रहाणेचा होणार पत्ता कट? चौथ्या टेस्टसाठी ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार टीम इंडिया)
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी डावात 23 हजार धावा पूर्ण करणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनून महान फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकेल. सचिनने 522 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. तर विराट कोहली अद्याप 500 डाव देखील खेळू शकलेला नाही. उजव्या हातचा फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात एक धाव घेतली तर तो त्याच्या 490 व्या डावात या कामगिरीची नोंद करेल. अशा स्थितीत तो सचिन तेंडुलकरला मागे टाकतील. कोहलीने आतापर्यंत तीनही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या 439 सामन्यांच्या 489 डावांमध्ये 22,999 धावा केल्या आहेत. तथापि, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की विराट कोहलीने कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या धावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने 23000 धावा फक्त कसोटी आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या होत्या. यामुळेच विराट कोहली सर्वात वेगवान 23 हजार धावा पूर्ण करेल. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23,000 धावा करणारा विराट जगातील सातवा क्रिकेटपटू बनेल.
मात्र, इंग्लंडविरुद्ध या मालिकेत कोहलीची बॅट फारशी चालली नाही. त्याने पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये फक्त 124 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. नॉटिंगहममधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. त्यानंतर भारताने लॉर्ड्सवर शानदार विजय नोंदवला तर इंग्लंडने हेडिंग्ले मैदान काबीज केले.