Team India Predicted XI: इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ज्या 11 खेळाडूंसह भारतीय संघ (Indian Team) मैदानात उतरू शकते, याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ लंडनमधील केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात किमान तीन बदलांसह मैदानात उतरू शकते. मात्र, भारत अजूनही चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह खेळणार आहे. आपण 20 विकेट घेतल्याशिवाय कसोटी सामना जिंकू शकत नाही असा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विश्वास आहे. हेच कारण आहे की त्याला परदेशात किमान चार वेगवान गोलंदाजांसोबत खेळायला आवडते आणि ते चौथ्या कसोटी सामन्यातही तेच करणार आहेत. मात्र, एका वेगवान गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तसेच अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) देखील पत्ता कट होऊ शकतो. (England's 4th Test, Predicted Playing XI: ओव्हल कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात ‘हे’ दोन मोठे उलटफेर, कोण होणार आऊट?)
सलामी जोडी
ओव्हल कसोटीत रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल सलामीला उतरू शकतात. आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यावर, उपकर्णधार रहाणे इंग्लिश गोलंदाजांसमोर पूर्णपणे फ्लॉप राहिला आहे. अशास्थितीत संघ व्यवस्थापन राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरवून मयंकला रोहित शर्मासोबत सलामीला उतरू शकते. अग्रवालने 14 कसोटी क्रिकेट सामने खेळलेल्या 23 डावांमध्ये 45.7 च्या सरासरीने 1052 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहेत.
मध्यम क्रम
ओव्हल कसोटीत भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार कोहली, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा, केएल राहुल आणि 23 वर्षीय युवा यष्टीरक्षक खेळाडू रिषभ पंतच्या खांद्यावर असेल. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात 91 धावांचे दमदार अर्धशतक झळकावत पुजाराने फॉर्ममध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले. त्याचबरोबर कर्णधार कोहली शेवटच्या सामन्यात चांगल्या लयीत दिसला. याशिवाय राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना उतरू शकतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राहुलकडे या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर सहाव्या क्रमांकावर पंत संघाला बळ देऊ शकतो.
गोलंदाजी क्रम
चौथ्या कसोटी सामन्यातही विराट चार गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची नावे निश्चित आहेत. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जागी शार्दुल ठाकूर प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक करू शकतो. याशिवाय जखमी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे खेळणे निश्चित आहे. यापूर्वी तीनही सामन्यांमध्ये अश्विनऐवजी जडेजाला संघात प्राधान्य देण्यात आले होते.
ओव्हल कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे असू शकते
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.