
England's 4th Test, Predicted Playing XI: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या मनोरंजक वळणावर पोहचली आहे. दोन्ही संघांमध्ये मालिका जिंकण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली तर लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) मैदानावर ब्रिटिश संघाने भारतीय फलंदाजांना लोळवत जोरदार पुनरागमन केले आणि मालिकेत बरोबरी साधली. अशा स्थितीत आता ओव्हल मैदानावर होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल आणि विरोधी संघावर पराभवाचे दडपण आणेल. त्यामुळे यजमान ब्रिटिश संघाने या सामन्यासाठी मजबूत खेळाडूंची निवड केली आहे जे भारताविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरू शकतात. कर्णधार जो रूटच्या (Joe Root) नेतृत्वातील इंग्लिश संघात चौथ्या कसोटीसाठी काही महत्वपूर्ण बदल होऊ शकतात. (IND vs ENG 4th Test: चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी नसीर हुसेन यांनी इंग्लंडला दिली चेतावणी, म्हणाले- ‘भारताला कमी लेखू नका, ही मालिका विसरू नका’)
इंग्लंडच्या आघाडीच्या क्रमवारीत फारसा बदल दिसत नाही आहे. रोरी बर्न्स आणि हसीब हमीद पुन्हा एकदा सलामीला उतरतील. तर तिसऱ्या स्थानावर डेविड मलान फलंदाजीला उतरेल. त्यांनतर जो रूट भारतीय खेळाडूंवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. तसेच जॉनी बेअरस्टो चौथ्या स्थानावर आक्रमण करण्यासाठी सज्ज असेल. त्यानंतर फॉर्मशी संघर्ष करणाऱ्या जोस बटलरला त्याच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानिमित्त बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या जागी विकेटकीपर-फलंदाज सॅम बिलिंग्सचा समावेश केला जाईल पण बेअरस्टो विकेट्सच्या मागील जबाबदार सांभाळेल. त्यानंतर मोईन अली आणि सॅम कुरनचे स्थान देखील कायम राहील. मोईन संघात एकमेव फिरकीपटू असेल. अखेरीस गोलंदाजी क्रमात देखील एक बदल होताना दिसत आहे. क्रेग ओव्हरटन आणि ओली रॉबिन्सन संघात कायम राहतील पण संघाच्या ज्येष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. अँडरसनच्या जागी क्रिस वोक्स संघाच्या वेगवान गोलंदाजी हल्ल्याचे नेतृत्व करू शकतो. वोक्सला साकिब महमूदच्या जागी 15 खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम कुरन, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिन्सन आणि क्रिस वोक्स.