IND vs ENG 4th Test: मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या दोन इंग्लंड खेळाडूंनी केला कहर, टीम इंडियाचा खेळ खराब केला
ओली पोप आणि क्रिस वोक्स (Photo Credit: PTI, Instagram)

IND vs ENG 4th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल (The Oval) मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 191 धावांनी संपुष्टात आला तर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने खराब सुरुवात करूनही 290 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावाच्या जोरावर यजमान ब्रिटिश संघाने भारतावर 99 धावांची आघाडी घेतली. ओली पोप (Ollie Pope) आणि क्रिस वोक्सने (Chris Woakes) शानदार अर्धशतके झळकावून संघाचा मोर्चा सांभाळला. इंग्लिश कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो ब्रिटिश गोलंदाजांनी योग्य ठरवला. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाजी अष्टपैलू शार्दूल ठाकूरला वगळता अन्य भारतीय फलंदाज इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी हल्ल्यापुढे तग धरू शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतले. (IND vs ENG 4th Test Day 2: ओव्हलवर रोहित-राहुलची शानदार सुरुवात, दिवसाखेरीस दुसऱ्या डावात भारताच्या बिनबाद 43 धावा)

यानंतर इंग्लंडची देखील पहिल्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या दिवशी 3 गडी गमावून 53 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारताने संघाला सुरुवातीला दोन धक्के दिले आणि अर्ध्या संघाला 62 धावांवर तंबुत धाडले. पण इथून भारताविरुद्ध पहिला टेस्ट सामना खेळण्यास मैदानात उतरलेल्या ओली पोपने संघातील आपली ताकद दाखवून शानदार अर्धशतक झळकावले. पोपनंतर अष्टपैलू वोक्सनेही आपला दम दाखवत अर्धशतकी धावसंख्या गाठली. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी संकटात सापडलेल्या इंग्लंड संघाची सुटका केली आणि भारताला अडचणीत टाकले. ओलीने 159 चेंडूंत 81 धावा केल्या ज्यामध्ये 6 चौकारांचा समावेश होते. दुसरीकडे, वोक्सने पहिले चेंडूने चार विकेट घेऊन भारताचे पुनरागमन संस्मरणीय केले पण नंतर 60 चेंडूत 50 धावाही चोपल्या. या दोन खेळाडूंच्या अर्धशतकांनी भारताला इंग्लंडचा संघ स्वस्तात गुंडाळण्यापासून रोखले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला संघ अडचणीत असताना पोपने पहिले जॉनी बेअरस्टो आणि नंतर मोईन अलीला साथीला घेत संघाचा डाव सावरला. पोपने बेअरस्टोसह 89 धावा तर मोईन अलीसह 71 धावांची भागीदारी केली.

दुसरीकडे, भारताने पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या तर इंग्लंडचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे यजमानांनी पहिल्या डावात भारतावर 99 धावांची भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरत दिवसाखेर बिनबाद 43 धावा केल्या असून ते अद्याप इंग्लंडच्या 56 धावांनी पिछाडीवर आहेत. भारताकडून रोहित शर्मा व केएल राहुलची सलामी जोडी मैदानात खेळत आहे.