रोहित शर्मा व केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रिटिश संघाने ओली पोप (Ollie Pope) आणि अष्टपैलू क्रिस वोक्सच्या (Chris Woakes) दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारली आणि भारतावर 99 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma)-केएल राहुल (KL Rahul) जोडी मैदानात उतरली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 20 धावा आणि राहुल 22 धावा करून खेळत होते. दुसऱ्या दिवसाखेर भारताने बिनबाद 43 धावा केल्या असून ते अद्याप इंग्लंडच्या 56 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, इंग्लिश संघ अडचणीत असताना पोपने फलंदाजीची धुरा सांभाळली आणि सर्वाधिक 81 धावा ठोकल्या तर वोक्सने भारतीय गोलंदाजांना त्रास देत अंतिम क्षणी 50 धावा लुटल्या. तसेच जॉनी बेअरस्टोने 37, मोईन अली 35 आणि डेविड मलाने 31 धावांचे छोटेखानी योगदान दिले. (IND vs ENG 4th Test: ओव्हलवर Rohit Sharma याची कमाल, सचिन तेंडुलकर-विराट कोहलीच्या ‘या’ विशेष क्लबमध्ये झाला सामील)

भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यानंतर उमेशने भारताकडून तब्बल आठ महिन्यानंतर पहिला कसोटी सामना खेळला आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबक शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दुसऱ्या सत्रात पोपने बेअरस्टो आणि मोईन अलीसह मोर्चा सांभाळला होता. यादरम्यान, त्याने अर्धशतकही पूर्ण केले. पोपने बेअरस्टोसह 89 धावा तर मोईन अलीसह 71 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, तिसऱ्या सत्रात पोप फार काळ टिकू शकला नाही आणि 77 व्या ओव्हरमध्ये शार्दुलने त्याला त्रिफळाचीत करत इंग्लंडचे मोठ्या आघाडीचे स्वप्न धुळीस मिळवले. पण नंतर वोक्स आणि जेम्स अँडरसनने भारतीय गोलंदाजांना अखेरच्या विकेटसाठी बरीच प्रतिक्षा करायला लावली. दरम्यान, वोक्सने अर्धशतकही पूर्ण केले. या दोघामध्ये अखेरच्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाली. अखेरच्या 84 ओव्हरमध्ये वोक्स 60 चेंडूत 50 धावा करुन धावबाद झाला आणि इंग्लंडचा डाव 290 धावांवर आटोपला.

यापूर्वी पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले असताना, लॉर्ड शार्दुल ठाकूर मात्र भिडला. त्याने अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक फटकावलं आणि आक्रमक खेळीने टीम इंडियाला 191 धावांपर्यंत मजल मारून दिली. शार्दूलपूर्वी कर्णधार कोहलीने देखील एकहाती झुंज देत 96 चेंडूत 50 धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडकडून दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या वोक्सने पहिल्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.