
IND vs ENG 4th Test Day 2: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकची घोषणा झाली असून यजमान संघाने 6 विकेट गमावून 153 धावा केल्या आहेत. अशास्थितीत, इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 205 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 52 धावांनी पिछाडीवर आहेत. चहापानची घोषणा झाली तेव्हा रिषभ पंत 36 धावा आणि वॉशिंग्टन सुंदर 1 धावा करून खेळत होते तर हिटमॅन रोहित शर्माचे (Rohit Sharma) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. रोहितने 144 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावांची खेळी केली. शिवाय, दुसऱ्या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 27 धावांची खेळी आणि अश्विनने 13 धावांचे योगदान दिले. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात जेम्स अँडरसन, बेन स्टोक्स आणि जॅक लीचने प्रत्येकी 1 यश मिळवून दिले. अँडरसनने रहाणे तर स्टोक्सने रोहितला आणि लीचने अश्विनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. (IND vs ENG 4th Test 2021: रोहित शर्माची एकहजारी, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला ओपनर)
रोहित शर्माने चौकार खेचत दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात केली. दुपारच्या जेवणापूर्वी रहाणे बाद झाल्याने रोहितला साथ देण्यासाठी रिषभ पंत क्रीजवर आला होता आणि टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करण्यासाठी रोहित-पंतच्या जोडीकडून मोठ्या भागीदारीची गरज होती. इंग्लिश गोलंदाज वरचढ होत असताना रोहित आणि पंतने सावध फलंदाजी केली. यादरम्यान, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना एका धावेसाठी रोहितला संघर्ष करावा लागला, पण अखेर स्टोक्सने रोहितला अर्धशतकापासून रोखंल. स्टोक्सने रोहितला एलबीडबल्यू आऊट करत माघारी पाठवलं. यानंतर पंत आणि अश्विनच्या जोडीला देखील इंग्लिश गोलंदाजांपुढे धावांची चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यानंतर, टी-ब्रेकच्या काही मिनिटांपूर्वी लीचने भारताला सहावा धक्का दिला आणि अश्विनला ओली पोपकडे झेलबाद केले. अश्विनने 2 चौकारांसह 13 धावांची खेळी केली.
यापूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. तर संघासाठी बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. भारतासाठी अक्षर पटेलने आपला फॉर्म कायम ठेवला आणि सर्वाधिक 4 इंग्लिश फलंदाजांना माघारी धाडलं. अश्विनला 3 तर मोहम्मद सिराजला 2 विकेट मिळाल्या.